‘अंबाबाई’ची संरक्षक भिंत तीन फुटाने वाढविणार

By admin | Published: March 30, 2016 01:34 AM2016-03-30T01:34:05+5:302016-03-30T01:34:27+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : पुरातत्त्व विभागाची ना हरकत घेणार

The wall of Ambabai will increase by three feet | ‘अंबाबाई’ची संरक्षक भिंत तीन फुटाने वाढविणार

‘अंबाबाई’ची संरक्षक भिंत तीन फुटाने वाढविणार

Next

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेसाठी संरक्षण भिंतीची उंची आणखी तीन फुटांनी वाढवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत झाला आहे. मात्र, उंची वाढविण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून ‘ना-हरकत दाखला’ घेणे बंधनकारक आहे. शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे काम पुरातत्त्व विभागाकडून ‘ना हरकत दाखला’ न मिळाल्याने रखडले आहे. ‘पुरातत्त्व’कडून परवाना घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे ही परवानगी मिळवूनच उंची वाढवावी लागणार आहे.
सध्या असलेल्या भिंतीशी साधर्म्य कायम ठेवून पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने ही उंची ठेवण्यावरही चर्चा झाली. अंबाबाई मंदिर सुरक्षितता आढावा बैठकीत हा निर्णय झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिवसेंदिवस अंबाबाई मंदिराला दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. परिणामी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षक भिंत (तटबंदी) वाढविण्याच्या विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचा आढावा सुरू असताना सुरक्षिततेसाठी भिंतीची उंची वाढविण्याचा निर्णय झाला. वाढीव भिंतीवर तारेचे कुंपण करण्यावर चर्चा झाली; परंतु त्यावर एकमत झाले नाही. मंदिर परिसरात वॉच टॉवर (टेहळणी मनोरा) उभारण्यात येणार आहे. तीन ठिकाणी नव्या पार्किंग जागा निश्चितीसाठी ७ एप्रिलला संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे. मंदिराच्या आवारातील मनकर्णिक कुंडावर उभारण्यात आलेल्या शौचालयासाठी पर्यायी जागा उपलब्ध करा, अशी सूचनाही डॉ. सैनी यांनी केली. मंदिर परिसराच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला.
बैठकीस महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) चंद्रकांत वाघमारे, पोलिस उपअधीक्षक भरतकुमार राणे आदी उपस्थित होते.

Web Title: The wall of Ambabai will increase by three feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.