गवळी गल्लीत घराची भिंत कोसळली, तीन म्हैशींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:03+5:302021-07-16T04:17:03+5:30
कोल्हापूर : महाद्वार रोडवरील जुन्या घराची भिंत कोसळण्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री उशिरा शनिवार पेठेतील गवळी गल्ली येथील ...
कोल्हापूर : महाद्वार रोडवरील जुन्या घराची भिंत कोसळण्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री उशिरा शनिवार पेठेतील गवळी गल्ली येथील घराची भिंत कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी तीन म्हैशी अडकल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुटका केली.
बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास महानगरपालिकेसमोरील गवळी गल्ली येथील श्रीपती गुरुलिंग गवळी यांची दोन मजली घराच्या मागील बाजूची भिंत अचानक कोसळली. याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ तेथे येत घरात आतील बाजूस असलेल्या खालच्या खोलीत अडकलेल्या तीन म्हैशींना भिंत पोखरून सुरक्षित बाहेर काढले.
उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, प्रभारी स्थानक अधिकारी जयवंत खोत, रेस्क्यू पथकाचे चालक संजय पाटील, तांडेल खानू शिनगारे, फायरमन निवास जाधव, उदय शिंदे, चालक दत्तात्रय जाधव, तांडेल सर्जेराव लोहार, फायरमन पुंडलिक माने यांनी मदतकार्यात भाग घेतला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.