जुन्या प्रांत कार्यालयाची भिंत ढासळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:26+5:302021-03-19T04:22:26+5:30
कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोरील जुन्या प्रांत कार्यालयाच्या इमारतीची भिंत गुरुवारी सकाळी ढासळली, सुदैवाने याठिकाणी कोणी उभे नसल्याने ...
कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोरील जुन्या प्रांत कार्यालयाच्या इमारतीची भिंत गुरुवारी सकाळी ढासळली, सुदैवाने याठिकाणी कोणी उभे नसल्याने पुढील अनर्थ टळला. हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांनी इमारतीची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला याची माहिती दिली.
अंबाबाई मंदिराच्या दक्षिण (विद्यापीठ) दरवाजासमोर ही हेरिटेज इमारत असून, तिचा समावेश ग्रेड वनमध्ये आहे. इथे पूर्वी प्रांत कार्यालय होते. ते काही वर्षांपूर्वी हलवण्यात आले. सध्या या इमारतीत दुय्यम निबंधक, करवीर क्रमांक १, नेहरू युवा केंद्र, होमगार्ड समावेशक व संचालक बाष्पके तसे विवाह नोंदणी ही कार्यालये आहेत. या इमारतीच्या उजव्या बाजूची भिंत अनेक वर्षांपासून कमकुवत झाली होती; तर काही ठिकाणी वडाचे झाड उगवून त्याची मुळे इमारतीच्या भिंतीमध्ये घुसली होती. त्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाला कळवण्यात आले होते; पण याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी गुरुवारी सकाळी या भिंतीचा काही भाग कोसळला. नेहमी या भिंतीलगत नागरिकांची वर्दळ असते. काहीवेळा छोटे विक्रेते, अंबाबाई दर्शनाला येणारे पर्यटक या ठिकाणी उभे असतात. सुदैवाने यावेळी भिंतीजवळ कोणी उभे नसल्यामुळे अनर्थ टळला.
---
गळतीचा प्रश्न
ही इमारत अतिशय जुनी झाली असून, गळतीचा मोठा प्रश्न आहे. कार्यालयांनी आपल्या पातळीवर गळती रोखली असली, तरी हेरिटेज असलेल्या या इमारतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी त्याची देखभाल व दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
----
फोटो नं १८०३२०२१-कोल-प्रांत बिल्डींग
ओळ : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोरील जुन्या प्रांत कार्यालयाच्या इमारतीची भिंत गुरुवारी सकाळी ढासळली. (छाया : आदित्य वेल्हाळ)