वडणगेत सेना-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर

By admin | Published: January 4, 2017 12:09 AM2017-01-04T00:09:33+5:302017-01-04T00:09:33+5:30

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ, नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार

Wandangate Army- Congress thorn in the thorn | वडणगेत सेना-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर

वडणगेत सेना-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर

Next

सुधाकर पाटील -- वडणगे  -राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या करवीर तालुक्यातील वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघावर गेली अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता होती. गेल्या पाच वर्षांपासून येथे शिवसेनेचे प्राबल्य आहे. तरीदेखील या ठिकाणी नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार असे चित्र आहे. जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित जाती महिलांसाठी येथील जागा आरक्षित असल्याने शिवसेना आणि काँग्रेस वगळता इतर पक्षांची उमेदवार शोधताना दमछाक होणार आहे. मात्र, वडणगे पंचायत समिती खुला झाल्याने सर्वच पक्षांत इच्छुकांची भाऊगर्दी आहे. दरम्यान, याच जिल्हा परिषद मतदारसंघातील खुपीरे पंचायत समिती मतदारसंघ महिलांसाठी खुला झाल्याने सर्वांनाच उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे. या संपूर्ण जिल्हा परिषदसंघात मागील निवडणूक पंचायत समितीसह तिन्ही जागांवर शिवसेनेने मुसंडी मारली असली तरीदेखील पुन्हा त्यांच्यासमोर काँग्रेसचे कडवे आव्हान राहणार असल्याने येथे काँटे की टक्कर होण्याची चिन्हे आहेत.
सलग २५ वर्षे काँग्रेसने आपल्याकडे ही जागा राखण्यात यश मिळविले होते. मात्र, २००९ च्या मतदारसंघ पुर्नरचनेत आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवून करवीरवर प्रथमच भगवा झेंडा फडकविला. या निवडणुकीत आ. नरके यांना वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघाने मताधिक्य दिले. तेव्हापासून आ. नरके यांनी या मोठ्या मतदारसंघावर आणखीन लक्ष केंद्रीत करत गठ्ठा मतदान देणाऱ्या या भागात थेट संपर्क वाढविला.
२००७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे बी. एच. पाटील आणि राष्ट्रवादीचे एस. आर. पाटील (प्रयाग चिखली) यांच्या लढतीत बी. एच. पाटील विजयी झाले. २०१२ च्या निवडणुकीत एस. आर. पाटील यांनी मागील निवडणुकीत पराभव झाल्यावर खचून न जाता या मतदारसंघात मित्र मंडळी, नातेवाईक यांच्या माध्यमातून आपला राबता कायम ठेवला. ही निवडणूक शिवसेनेकडून लढविली. यामध्ये काँग्रेसचे तत्कालीन जि. प. सदस्य बी. एच. पाटील व एस. आर. पाटील यांच्या पुन्हा झालेल्या लढतीत एस. आर. पाटील विजयी झाले.
आ. नरके यांनी मतदारसंघात केलेल्या कामांचा धडाका आणि जनसंपर्कामुळे त्यांचे नाव नेहमीच चर्चेत आहे. जि. प. सदस्य एस. आर. पाटील यांनी आमदारांच्या मार्गदर्शनाखाली पाच कोटींची भरीव कामे केली. त्यामध्ये लाभार्थ्यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून त्याचा लाभ देणे, हद्दवाढ विरोध व विविध प्रश्नावर आवाज उठविणे, आदी कामात सातत्य ठेवले असले तरी आणखीन कामे व्हायला हवी होती असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. पंचायत समिती सदस्य सरदार मिसाळ हे आपल्या पत्नी कोमल मिसाळ यांना जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेतून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. त्याबरोबरच उच्चशिक्षित अस्मिता भगवान नांगरे या आणि वडणगे सेवा संस्थेचे माजी सभापती विठ्ठल नांगरे हे सेनेकडून आपल्या पत्नीसाठी आग्रही आहेत. शिवसेनेतूनच पंचायत समितीसाठी तालुका उपप्रमुख सुनील पोवार इच्छुक आहेत. म्हणून रमेश कुंभार व जयवंत कुंभार हे देखील इच्छुक आहेत. आमदार समर्थक इंद्रजित पाटील यांनी देखील निवडणूक लढविण्याचा मनसुबा आखला आहे.
काँग्रेस अंतर्गत वडणगेत दोन गट आहेत. मतदान संख्याही या गावात दहा हजारांवर आहे. मागील दोन विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीत येथील मतेच निर्णायक ठरलेली आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांची या मतदारसंघात कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. या गावांबरोबरच मतदारसंघातील सर्वच गावागावांत कार्यकर्त्यांमधील यशस्वी समझोताच शिवसेनेला टक्कर देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसकडून माजी ग्रा. पं. सदस्य विनोद माने यांच्या पत्नी शैला या एकमेव उमेदवार सध्यातरी इच्छुक आहेत. तर वडणगे पंचायत समितीसाठी काँग्रेसकडून प्रयाग-चिखलीचे माजी सरपंच केवलसिंग रजपूत इच्छुक आहेत. वडणगेचे माजी उपसरपंच सचिन चौगले यांनी गेल्या १५ वर्षांपासून समाजकार्याबरोबरच व्यक्तीगत कामांच्या माध्यमातून घराघरात पोहोचण्यात यश मिळविल्याने ते देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
राष्ट्रवादीही तुल्यबळ उमेदवारांच्या शोधात आहे. पक्षपातळीवर जो निर्णय होईल त्याप्रमाणे उमेदवार रिंगणात उतरले जातील असे जिल्हा सरचिटणीस सुनील परीट यांनी सांगितले.
भाजपानेही निवडणुकीची मोट बांधलेली आहे. त्यातच महाडिक गटाची ताकद मिळाल्यास भाजपाला कमी लेखून चालणार नाही. सध्यातरी पक्षासाठी काम करणारे सरदार जाधव, अशोक चौगले, एस. बी. देवणे हे इच्छुक असून अनिल ठाणेकर, संभाजी पाटील, आनंदराव पवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम चालू आहे. ऐनवेळी येथे ताकदीचा उमेदवार आयात केला जाण्याची चर्चा आहे.
सदाशिव पाटील-मास्तर यांचे चिरंजीव बाजीराव पाटील पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत. वडणगेतील राजकारणात त्यांचा एक गट सक्रिय असून ग्रामपंचायत, दूधसंस्था, पाणी पुरवठा, आदी ठिकाणी त्यांच्या गटाच्या सत्ता आहेत.
खुपीरे पंचायत समिती महिलांसाठी खुला झाल्याने सेनेतून पं. स. सदस्य तानाजी आंग्रे हे आपल्या मुलीच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. पं. स. माजी सदस्या संगीता पाटील याही सेनेतून इच्छुक आहेत.


या मतदारसंघात मागील वेळी १० गावांचा समावेश होता. यावेळी हणमंतवाडीचा समावेश झाल्याने ११ गावे होऊन सुमारे ३४ हजारांवर येथील मतदारांची संख्या झालेली आहे.

२०१२ ची लढत :
सर्वसाधारण पुरुष ओपन (जिल्हा परिषद)
संभाजी रंगराव पाटील (शिवसेना) - १२७८१
बळीराम हरी पाटील (काँग्रेस) - ९०२४
सुनील बंडोपंत पाटील (राष्ट्रवादी) - ९२८
वडणगे पंचायत समिती - अनुसूचित जाती पुरुष
सरदार दयानंद मिसाळ (शिवसेना) - ६७७५
यशवंत सदाशिव नांगरे (काँग्रेस) - ३५९३
वसंतराव कुंडलिक नाईक (राष्ट्रवादी) - ११५१
खुपीरे पंचायत समिती - सर्वसाधारण पुरुष
तानाजी आंग्रे (अपक्ष) - ४०५०
संजय सखाराम पाटील (शिवसेना) - ३१७१
दिलीप रंगराव पाटील (काँग्रेस) - ३११०
कृष्णात धुंदरे - ३१४
शंकर राऊ पाटील - १३१


जिल्हा परिषद मतदारसंघातील गावे : वडणगे, प्रयाग चिखली, आंबेवाडी, वरणगे, पाडळी बुद्रुक, निटवडे, खुपीरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, दोनवडे (२०१२ च्या निवडणुकीत १० गावे) सध्याच्या निवडणुकीत हणमंतवाडीचा समावेश (एकूण सध्या ११ गावे)
वडणगे पंचायत समिती मतदारसंघातील गावे : वडणगे, आंबेवाडी, प्रयाग-चिखली
खुपीरे पंचायत समिती मतदारसंघातील गावे : खुपीरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, दोनवडे, वरणगे, पाडळी बुद्रुक, निटवडे आणि हणमंतवाडी

वडणगे पंचायत समितीसाठी इच्छुक : इंद्रजित पाटील, रमेश कुंभार, जयवंत कुंभार, सुनील पोवार, शुभांगी पोवार (सर्व शिवसेना), सचिन चौगले, केवलसिंग रजपूत (काँग्रेस), सरदार जाधव, एस. बी. देवणे, अशोक चौगले (भाजपा), सुनील परीट (राष्ट्रवादी), बाजीराव सदाशिव पाटील (सध्यातरी अपक्ष)

Web Title: Wandangate Army- Congress thorn in the thorn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.