भटक्या-विमुक्त समाजातर्फे दंडवत

By admin | Published: June 16, 2015 11:36 PM2015-06-16T23:36:37+5:302015-06-17T00:41:53+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयावर अनोखा मोर्चा : विविध मागण्यांसाठी उघड्या अंगानिशी काठ्या बडवत आक्रोश

Wandering-fed society | भटक्या-विमुक्त समाजातर्फे दंडवत

भटक्या-विमुक्त समाजातर्फे दंडवत

Next

कोल्हापूर : स्वत:चे गाव नाही की राहते घर. जन्माच्या नोंदी झालेल्या नाहीत की महसुली पुरावे नाहीत. शाळेलाच गेलो नाही, तर शाळा सोडल्याचा दाखला कोण देणार, गाव-घर नसल्याने रेशनकार्ड नाही, अशा बिकट स्थितीत जीवन जगणाऱ्या जिल्ह्यातील भटक्या समाजाला न्याय मिळावा म्हणून गेली काही वर्षे लढा सुरू आहे; पण सरकारी बाबू न्याय द्यायला तयार नाहीत. त्यामुळे भटक्या-विमुक्त समाजातील संतप्त नागरिकांनी मंगळवारी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दंडवत आंदोलनाने आक्रोश केला. त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली.
जिल्ह्यात ठिकठिकाणी सरकारी गावरानात अतिक्रमण करून राहत असलेल्या भटक्या-विमुक्त समाजाच्या नागरिकांना राहत्या जागा मालकी हक्काने द्याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी भटक्या-विमुक्त मुक्ती आंदोलन संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा काढला. गेल्या अनेक वर्षांपासून मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून उघड्या अंगाने दंडवत घालत रस्त्यावर काठ्या बडवीत आक्रोश केला. बिंदू चौक येथून हा मोर्चा सुरू झाला. मोर्चात सुमारे तीनशेंहून अधिक महिला-पुरुष सहभागी झाले होते. दुपारच्या वेळी भर उन्हात भटक्या-विमुक्त समाजातील असंख्य तरुण दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्यावर उघड्या अंगाने दंडवत घालत होते. तापलेल्या रस्त्यांवर घातले जाणारे दंडवत पाहून येणारे जाणारे शहरवासीय हळहळत होते.
मोर्चा बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महानगरपालिका, सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी दोन वाजता पोहोचला. या मोर्चामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांना अन्य मार्गांनी वाहतूक वळवावी लागली. मोर्चात संतप्त घोषणाबाजी करण्यात येत होती. ‘एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झालंय बेपत्ता’, ‘भटक्या विमुक्तांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, अशा घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा अडविल्यानंतर घोषणाबाजीला अधिकच जोर चढला. मोर्चासमोर भटक्या - समाज मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष भीमराव साठे यांनी आपल्या भाषणात आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. नंतर उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले यांना निवेदन देण्यात आले.
पारगाव, टोप, नागाव, कसबा वडगाव, मौजे तासगाव (ता. हातकणंगले) येथे गायरानांत वास्तव्यास असणाऱ्या भटक्या समाजातील नागरिकांना घरांसाठी हक्काची जमीन द्यावी, भटक्या विमुक्तांना मूळ गाव नाही, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले या कोणत्याही बाबी उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे ही जाचक अट शिथिल करून स्थानिक चौकशी ग्राह्य मानावी; तसेच शासन निर्णयानुसार गोपाळ, नंदिवाले, नाथपंथी, डवरी, गोसावी या समाजातील अशिक्षितांना घरकुल योजनेकामी जातीचे दाखले देण्यात यावेत, दारिद्र्यरेषेखालीलची अट शिथिल करून कुटुंब बेघर असल्यास स्थानिक चौकशी करून घरकुल योजनेचा लाभ मिळावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)


'रुपयाचा कढीपत्ता सरकार झालं बेपत्ता'
‘एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झालंय बेपत्ता’ या घोषणेबरोबरच दंडवत मोर्चा लक्षवेधी ठरला.
पारगाव, टोप, नागांव, कसबा वडगाव, मौजे तासगाव (ता. हातकणंगले) येथे गायरानांत वास्तव्यास असणाऱ्या भटक्यांना घरांसाठी हक्काची जमीन द्यावी.
दारिद्र्यरेषेखालीलची अट शिथिल करून कुटुंब बेघर असल्यास स्थानिक चौकशी करून घरकुल योजनेचा लाभ मिळावा.
भटक्या विमुक्तांना मूळ गाव नाही, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले या कोणत्याही बाबी उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे ही जाचक अट शिथिल करून स्थानिक चौकशी ग्राह्य मानावी.
शासन निर्णयानुसार गोपाळ, नंदिवाले, नाथपंथी, डवरी, गोसावी या समाजातील अशिक्षितांना घरकुल योजनेच्या लाभासाठी जातीचे दाखले द्यावेत.

Web Title: Wandering-fed society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.