‘संग्राम कक्षा’चा गाशा गुंडाळला

By admin | Published: December 31, 2015 11:43 PM2015-12-31T23:43:31+5:302015-12-31T23:54:56+5:30

शासनाकडून मुदतवाढ नाही : राज्यातील २० हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

The war of 'Sangram orbit' was rolled down | ‘संग्राम कक्षा’चा गाशा गुंडाळला

‘संग्राम कक्षा’चा गाशा गुंडाळला

Next

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर -शासनाकडून मुदतवाढ न मिळाल्याने राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समितीसह ग्रामपंचायतीतील ‘संग्राम कक्षा’चा आज, शुक्रवारी म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे राज्यातील २० हजार संगणक परिचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. आॅनलाईन कामकाजही बंद झाले आहे. ग्रामपंचायती आॅफलाईन झाल्या आहेत. कक्षातील कामकाजाचा गुरुवारी शेवटचा दिवस ठरला.
शासनाच्या ग्रामविकास आणि जलसंधारण विभागातर्फे ३० एप्रिल २०११ रोजी निर्णय घेऊन राज्यात ‘संग्राम कक्ष’ सुरू करण्यात आले. पंचायत राज संस्थांचे संगणकीकरण व बळकटीकरण करणे, कारभारात सुसूत्रता, पारदर्शकता आणणे या प्रमुख उद्देशासाठी कक्ष सुरू केले. कक्ष चालविण्याची जबाबदारी महाआॅनलाईन कंपनीला देण्यात आली. कंपनीने एक हजार लोकसंख्येवरील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथील कक्षात संगणक परिचालकांची नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर केली. जिल्हा परिषदेच्या कक्षातील जिल्हा समन्वयकाच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. कक्षामुळे ‘ई-ग्रामपंचायती’ झाल्या.
महात्मा गांधी रोजगार हमी योजना, इंदिरा आवास, पंचायत राज संस्थांच्या अभिलेखांचे स्कॅनिंग, डिजीटलायझेशन करणे, ग्रामस्थांना आॅनलाईन दाखले देणे, संगणक साक्षरता वाढविणे, कारभार आॅनलाईन करणे, पंचायत राज संस्थांचा कोष तयार करणे, ई-आॅफिसची अंमलबजावणी करणे आदी कामे कक्षातून केली जात होती. त्यासाठी ‘संग्राम’मधील परिचालकांना चार ते सात हजार रुपयांपर्यंत कंपनीतर्फे पगार दिला जात होता. राज्यातील सर्व ‘संग्राम’मध्ये २० हजार परिचालक कार्यरत होते. ‘संग्राम’धील आॅनलाईन कामकाजात राज्यात कोल्हापूर जिल्हा परिषद पहिला राहिला. अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांना वेळेत दाखले मिळत होते. त्यामुळे चांगली सोय झाली होती.
दरम्यान, संग्राम कक्षातील सर्व परिचालक एकत्र येऊन संघटना स्थापन केली. राज्य संग्राम संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली नोकरीत कायम करावे, पगारात वाढ करावी यासाठी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर आंदोलन छेडले. हिवाळी अधिवेशनावरही मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
इतका पाठपुरावा करूनही संघटनेला आश्वासनाशिवाय फारसे काही मिळाले नाही. दोन ते तीन महिन्यांच्या परिचालकांचा पगारही मिळालेला नाही. परिणामी त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.


गुरुवार कामकाजाचा शेवटचा दिवस
आंदोलनाच्या माध्यमातून शासनाशी संघर्ष केला. तरीही शासनाने परिचालकांच्या मागण्याही मान्य झाल्या नाहीत आणि मुदतवाढही दिली नाही. परिणामी ३१ डिसेंबर ‘संग्राम’मधील संगणक परिचालकांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस ठरला.


संग्राम कक्षाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, अद्याप मुदतवाढीचा आदेश शासनाकडून आलेला नाही. आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
- अविनाश सुभेदार,
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), कोल्हापूर.

Web Title: The war of 'Sangram orbit' was rolled down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.