कोल्हापूर: वारणा'ने दूध खरेदी दरात केली वाढ, आजपासून लागू होणार नवे दर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 12:59 PM2022-10-21T12:59:31+5:302022-10-21T13:00:23+5:30
चाऱ्याची टंचाई, पशुखाद्यात झालेली दरवाढ या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दरवाढ देण्याची घोषणा
वारणानगर : अवकाळी पावसामुळे निर्माण झालेली चाऱ्याची टंचाई, पशुखाद्यात झालेली दरवाढ या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी गायीच्या खरेदी दुधाला प्रति लिटर ३ रुपयांची तर म्हैस दुधाला प्रति लिटर २ रुपयांची दरवाढ देण्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केली.
दिवाळी सणाच्या तोंडावर ही दरवाढ मिळाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असून, ही दरवाढ शुक्रवार, दि. २१ रोजी (आज) पासून लागू केली जाणार आहे. शेतकऱ्यांना दूध दरवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
यावेळी डॉ. कोरे म्हणाले, गाय दुधासाठी ३.५ फॅटला व ८.५ एस. एन. एफ. ला ३५ रुपये दर मिळणार आहे तर म्हैस दुधासाठी ६.० फॅट व ९.० एस. एन. एफ. ला ४७.५० पैसे इतका उच्चांकी दर मिळणार आहे. संघाने लम्पी स्कीन आजारावर मोहीम सुरू करून दीड लाखांवर मोफत लस जनावरांना दिली. अमृत पशुधन सुरक्षा कवच योजनेतून ३० लाख रुपयांचे अनुदान दूध उत्पादकांना दिले आहे. अल्पदरात पशुवैद्यकीय सेवा व रेडी संगोपनसारखे उपक्रम संघामार्फत राबविले जात असल्याचे कार्यकारी संचालक येडूरकर यांनी सांगितले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकौंटस् मॅनेजर सुधीर कामेरीकर, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, मार्केटिंग इन्चार्ज अनिल हेर्ले उपस्थित होते.