वारणा चोरी प्रकरण : घनवट, चंदनशिवे यांच्यासह सातजणांना दहा दिवसांची डेटलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 09:33 PM2017-07-25T21:33:03+5:302017-07-25T21:33:03+5:30
वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणातील संशयित आरोपी निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, कॉन्स्टेबल दीपक पाटील, कुलदीप कांबळे या चौघांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
कोल्हापूर, दि. 25 - वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणातील संशयित आरोपी निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, कॉन्स्टेबल दीपक पाटील, कुलदीप कांबळे या चौघांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी अटकपूर्व जामिन फेटाळण्याचे उच्च न्यायाधीश रेवती मोहिते-ढेरे यांनी संकेत देताच आरोपींनी स्वत:हून जामीन अर्ज माघारी घेत दहा दिवसात पोलीसांत हजर राहण्याची लेखी ग्वाही दिली. त्यावर न्यायालयाने त्यांच्या अटकेसाठी पोलीसांना आदेश दिले.
शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने नऊ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करणारे सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, कॉन्स्टेबल शंकर पाटील, दीपक पाटील, पोलीस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्याविरोधात कोडोली पोलिसांत चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. या सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले होते. या सर्वांचे अर्ज न्यायालयाने फेटाळले होते. त्यानंतर आशेपोटी पुन्हा चौघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपींच्या वतीने अॅड. अशोक मुंडरगी, हर्षद निंबाळकर, सत्यवर्तक जोशी यांनी युक्तीवाद मांडला. तर सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. प्राजक्ता शिंदे यांनी व फिर्यादी झुंझार सरनोबत यांच्या वतीने अॅड. अभिजित आडगुळे यांनी युक्तीवाद मांडला. या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी उच्च न्यायाधिश मोहिते-ढेरे यांचेसमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून न्यायाधिशांनी जामीन अर्ज फेटाळण्याचे संकेत दिले. यावेळी आरोपींनी अर्ज फेटाळू नये, आम्ही स्वत:हून मागे घेवून दहा दिवसात पोलिसात हजर राहतो असे लेखी दिले. त्यावर न्यायालयाने संशयित आरोपींच्या अटकेचे आदेश राज्य गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांना दिले.