प्रभागाचा कानोसा (शिवाजी विद्यापीठ-कृषी महाविद्यालय) : विजयाची पदवी मिळविणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:22 AM2021-03-15T04:22:26+5:302021-03-15T04:22:26+5:30

प्रभाग क्रमांक ६४ विद्यमान नगरसेवक : प्रवीण केसरकर आताचे आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) विजयाची पदवी मिळविणार ...

Ward Canosa (Shivaji University-Agricultural College): Who will get the degree of Victory? | प्रभागाचा कानोसा (शिवाजी विद्यापीठ-कृषी महाविद्यालय) : विजयाची पदवी मिळविणार कोण?

प्रभागाचा कानोसा (शिवाजी विद्यापीठ-कृषी महाविद्यालय) : विजयाची पदवी मिळविणार कोण?

googlenewsNext

प्रभाग क्रमांक ६४

विद्यमान नगरसेवक : प्रवीण केसरकर

आताचे आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

विजयाची पदवी मिळविणार कोण?

संतोष मिठारी,

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : मागील निवडणुकीमध्ये नव्याने तयार झालेला शिवाजी विद्यापीठ-कृषी महाविद्यालय हा प्रभाग यंदा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला) आरक्षित झाला आहे. या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी सध्या सात उमेदवार इच्छुक आहेत. त्यातील चार उमेदवार काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत.

गेल्या निवडणुकीवेळी प्रभाग रचनेमुळे टेंबलाई मंदिर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, शिवाजी विद्यापीठ अशा चार प्रभागांतील २५ ते ३० टक्के प्रभाग मिळून एक शिवाजी विद्यापीठ-कृषी महाविद्यालय असा नवा प्रभाग क्रमांक ६४ तयार करण्यात आला. या प्रभागात ७० टक्के सुशिक्षित, तर ३० टक्के मजूर, कामगार मतदार आहेत. त्र्यंबोली कॉलनी, प्रगती कॉलनी, सुदर्शन आणि कलानंद हौसिंग सोसायटी, महापौर चौक परिसर, उचगाव जकात नाका, आदी परिसराचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत हा प्रभाग सर्वसाधारण खुला झाला. त्यावेळी प्रवीण केसरकर (काँग्रेस), रशीदअली बारगीर (राष्ट्रवादी), प्रकाश काटे (ताराराणी), रवींद्र मुतगी (अपक्ष), संदीप पाटील (शिवसेना) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यातील प्रवीण केसरकर यांनी १३८६ मते घेत विजय मिळविला. या निवडणुकीवेळी प्रभागात एकूण मतदान २८५५ होते. त्यापैकी २००६ इतके मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीकरिता या प्रभागामधील आरक्षण बदलले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक केसरकर हे त्यांच्या पत्नी आरती केसरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत. पूर्वीच्या विक्रमनगर प्रभागातून १९९० आणि २००० मध्ये महापालिकेमध्ये प्रतिनिधीत्व केलेल्या आणि सध्या महापौर चौक परिसरात राहणाऱ्या माजी उपमहापौर आणि माजी सभागृह नेता सुलोचना बंडोपंत नाईकवाडे यांनी देखील तयारी सुरू केली आहे. त्या काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. प्रगती कॉलनीत राहणारे आणि जुन्या विक्रमनगर प्रभागाचे माजी नगरसेवक रवींद्र मुतगी यांनी त्यांच्या पत्नी नूतन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. नूतन मुतगी या भाजप-ताराराणी आघाडीकडून इच्छुक आहेत. प्रगती कॉलनीतील मश्जिदचे चेअरमन वसीम अत्तार यांनी गेल्यावेळी प्रवीण केसरकर यांना मदत केली होती. यावेळी अत्तार यांच्या आई हसिना अत्तार या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक आहेत. महालक्ष्मी संकुल येथे राहणाऱ्या आणि राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेतील महिला सुरक्षा कौन्सिलच्या राज्य अध्यक्षा आयेशा सलीम शेख या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्या हिंदुस्थान जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत आहेत. चित्तोडीया समाजाच्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या रंजिता नारायण चौगुले यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या संघटनेत त्या कार्यरत आहेत. कलानंद कॉलनीतील महिला बचत गटात कार्यरत असणाऱ्या अस्मिता अजित माने या काँग्रेसकडून इच्छुक आहेत. या इच्छुकांनी विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रभागामध्ये संपर्क वाढविला आहे. पाईपलाईनसाठी काही ठिकाणी खुदाई केलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण लवकर पूर्ण व्हावे, अशी प्रभागातील नागरिकांची मागणी आहे. यंदाच्या निवडणुकीत या प्रभागातून विजयाची पदवी कोण मिळविणार, याबाबत उत्सुकता आहे.

प्रतिक्रिया...

प्रभागात अमृत योजनेद्वारे घर तेथे पाण्याची पाईपलाईन पोहोचवली आहे. आठ किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केले. चॅनेल गटर्स, क्रॉसलाईन, टेंबलाईवाडी परिसरातील खणीची स्वच्छता आदी पायाभूत सुविधांबाबतची कामे केली आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि महानगरपालिकेकडून मिळालेल्या फंडासह माझ्या स्वनिधीतून सुमारे पावणेतीन कोटींची कामे प्रभागात केली आहेत. काँग्रेसचा सभागृह नेता म्हणून जबाबदारी निभावली. सर्वांना बरोबर घेऊन काम केले. प्रभागाला नवा चेहरा देण्यासाठी कार्यरत राहिलो. विरंगुळा केंद्र, ओपन जिम, खण परिसराचे सुशोभिकरण आदी कामे अद्याप शिल्लक आहेत.

- प्रवीण केसरकर, नगरसेवक

पाच वर्षांतील कामे...

१) अमृत योजनेतून १६०० मीटर पाईपलाईनचे काम

२) राज्यातील पहिल्या निर्मलग्राम शौचालयाची उभारणी

३) टेंबलाईवाडी उड्डाणपूल ते उचगाव जकात नाका या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण

४) सुदर्शन कॉलनीतील घरांमध्ये घुसणारे पावसाचे पाणी थांबविण्यासाठी ३६ लाखांची चॅनेल गटर्सची बांधणी

शिल्लक कामे...

१) महापौर चौक ते टेंबलाईवाडी विद्यालय आणि सुदर्शन कॉलनी ते टेंबलाईवाडी रस्त्याचे डांबरीकरण

२) कलानंद कॉलनीतील खुल्या जागेचे सुशोभिकरण

३) प्रगती कॉलनीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी

४) टेंबलाईवाडी मंदिर ते बीएसएनएल टॉवर या मार्गावर नागरिकांना विश्रांतीसाठी बेंच बसविणे

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते...

प्रवीण केसरकर (काँग्रेस) : १३८६

रशीदअली बारगीर (राष्ट्रवादी) : २२७

प्रकाश काटे (ताराराणी) : २१६

फोटो (१४०३२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ प्रभाग फोटो ०१, ०२) :

शिवाजी विद्यापीठ-कृषी महाविद्यालय या प्रभागातील टेंबलाईवाडी उड्डाणपूल ते उचगाव जकात नाकापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Ward Canosa (Shivaji University-Agricultural College): Who will get the degree of Victory?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.