ग्रामपंचायत निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, प्रभाग रचना निश्चित, घोषणा सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 01:53 PM2020-10-28T13:53:15+5:302020-10-28T13:55:45+5:30
निवडणूक आयोगाने हिरवा कंदिल दाखविल्यानंतर कोरोनामुळे स्थगित झालेल्या जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे नव्याने काउंटडाऊन सुरू झाले आहे. डिसेंबर अथवा नवीन वर्षात निवडणुका होतील, असे गृहीत धरून प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून त्याची औपचारिक घोषणा सोमवारी (दि. २ नोंव्हेबर) होणार आहे. याचवेळी आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे.
कोल्हापूर : निवडणूक आयोगाने हिरवा कंदिल दाखविल्यानंतर कोरोनामुळे स्थगित झालेल्या जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे नव्याने काउंटडाऊन सुरू झाले आहे. डिसेंबर अथवा नवीन वर्षात निवडणुका होतील, असे गृहीत धरून प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून त्याची औपचारिक घोषणा सोमवारी (दि. २ नोंव्हेबर) होणार आहे. याचवेळी आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे.
मार्चमध्ये आलेल्या कोरोना व लॉकडाऊनमुळे जून व डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या राज्यातील दीड हजारांवर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केला होता. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या कुंभवडे व मांजरे (ता.शाहूवाडी), पोंबरे (ता.पन्हाळा), चिंचणे (ता.चंदगड) चार ग्रामपंचायतींची प्रभागासह सर्व कार्यक्रम पूर्ण होऊनदेखील निवडणूक स्थगित करण्यात आली. इतर ४२५ गावांच्या मुदत डिसेंबरमध्ये संपत आहेत.
आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने या निवडणुकीचे बिगुल वाजविण्यात आले आहे. त्याची प्रभाग निश्चितीची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण झाली आहे. तथापि निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तो २ नोव्हेंबरलाच अधिकृतपणे जाहीर होणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
सरपंचपदाच्या आरक्षणाचे वेध
थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा मागील सरकारचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळे यावेळी होणाऱ्या निवडणुका जुन्या पद्धतीने होणार आहे. निवडून आलेल्या सदस्यांतूनच सरपंच निवड होणार आहे. त्यासाठीची आरक्षण प्रक्रिया प्रभाग निश्चितीनंतर सुरू होणार आहे. त्यामुळे प्रभाग व सरपंच पदाचे आरक्षण काय पडते, याकडे आता लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीची कसोटी
प्रभाग निश्चिती झाल्यानंतर खऱ्याअर्थाने गावोगावी धुरळा उडणार आहे. दिवाळीनंतर ही प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेतृत्वाची व महाविकास आघाडी पॅटर्नची कसोटी लागणार आहे.
येथे होणार निवडणुका
- करवीर ५४
- गडहिंग्लज ५०
- भुदरगड ४५
- पन्हाळा ४१
- शाहूवाडी ३९
- शिरोळ ३३
- आजरा २६
- हातकणंगले २१
- राधानगरी १९
- गगनबावडा ०८
- चंदगड ०४