प्रभाग कानोसा - ‘तुळजाभवानी’ प्रभागात दिंडोर्ले यांची भूमिका निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:31+5:302021-03-20T04:21:31+5:30
विद्यमान नगरसेवक - राजू आनंदा दिंडोर्ले सध्याचे आरक्षण - अनुसूचित जाती महिला लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : क्षेत्रफळाने बराच ...
विद्यमान नगरसेवक - राजू आनंदा दिंडोर्ले
सध्याचे आरक्षण - अनुसूचित जाती महिला
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : क्षेत्रफळाने बराच मोठा, संमिश्र लोकवस्ती परंतु विकासाला पुरेशी संधी असलेल्या उपनगरातील प्रभाग क्रमांक ७५ - आपटेनगर तुळजाभवानी मंदिर प्रभागात नगरसेवक राजू दिंडाेर्ले यांनी केलेल्या विकास कामाबाबत प्रभागात समाधान व्यक्त केले जात असून दिंडाेर्ले सांगतील तोच उमेदवार भावी नगरसेवक होऊ शकतो. त्यामुळे कोणा एका राजकीय पक्षाकडे उमेदवारी मागण्याऐवजी येथील इच्छुकांची ‘तुमचा मला पाठिंबा द्या’ अशी विनंती त्यांना केली जात आहे.
प्रभागाचे नेतृत्व प्रथमच केलेल्या राजू आनंदराव दिंडाेर्ले यांनी मागची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. मनसेचे कार्यकर्ते असताना त्यांच्यासमोर अन्य पक्षाचे पर्याय होते. तरीही अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशा चार प्रमुख पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करुन ते विजयी झाले. नंतरच्या काळात त्यांना भाजप - ताराराणी आघाडीला पाठिंबा दिला. राज्यात त्यावेळी भाजप - सेनेची सत्ता असल्यामुळे प्रभागाच्या विकासाला जास्तीत जास्त निधी मिळेल ही त्यामागची भूमिका होती.
मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे गौरव सावंत, भाजपच्या संगीता सावंत, कॉंग्रेसचे महेश गायकवाड, शिवसेनेचे संजय राणे यांनी चांगली लढत दिली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या गौरव सावंत व भाजपच्या संगीता सावंत यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे अपक्ष असलेल्या दिंडोर्ले यांचा टिकाव लागेल का अशी शंका उपस्थित होत होती. परंतु या सगळ्या अटकळींना छेद देत दिंडोर्ले यांनी विजय संपादन केला.
मतदारांनी विश्वास टाकल्यामुळे दिंडोर्ले व त्यांचे बंधू विशाल यांनी प्रभागातील विकास कामांना वाहून घेतले. गेल्या पाच वर्षात त्यांनी मोठी कामे केली आहेत. रस्ते, गटारी, ड्रेनेज लाईन ही रुटीनची कामे आहेत. त्यांनी ती पूर्ण केलीच शिवाय प्रभागात मोठे क्रीडांगण, नागरी आरोग्य केंद्र, विरंगुळा केंद्र उभे केले. सातशे लोकांना एका वेळी बसता येईल असा चाळीस लाख रुपये खर्च करुन सांस्कृतिक हॉल उभारणीचे काम सुरु केले आहे. हॉल मोफत देण्याचे त्यांचे नियोजन आहे.
प्रभागातील स्वच्छता व कचरा उठाव यावर त्यांनी भर दिल्यामुळे प्रभागात कचऱ्याची समस्या दिसत नाही. प्रभागाचा स्वच्छ भारत अभियानमध्ये दोन वेळा प्रथम क्रमांक आला होता. मतदारांशी त्यांचा रोजचा संपर्क आहे. यावेळी प्रभागावर अनुसूचित जाती - महिला असे आरक्षण पडल्यामुळे दिंडाेर्ले यांच्यापेक्षा मतदार अधिक नाराज झाले. गेल्या काही दिवसात त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. पुढे काय करायचे असे त्यांनी विचारले तेव्हा मतदारांनी ‘तुम्ही जो उमेदवार द्याल, त्याला निवडून आणू’ अशी ग्वाही दिली. फार क्वचित व्यक्तींच्या बाबतीत असे पहायला मिळते.
यावेळी प्रभागातून रविना सुनील कांबळे, सोनल राहुल कांबळे, सुमन प्रभाकर कांबळे, अर्चना उदय गायकवाड, मिनल राजेश गायकवाड, शिवगंगा कॉलनील सपाटे, पुनम सुळगावकर यांची नावे चर्चेत आहेत. अर्चना गायकवाड यांचे पती उदय कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा संपूर्ण सानेगुरुजी वसाहत परिसरात परिचय व काम आहे. नागरी सुविधा केंद्र ते चालवितात, त्यांच्या वहिनी डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांचा अनेक घरांशी, मतदारांशी थेट संपर्क आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल हे या प्रभागातून सध्या कळत नसले तरी दिंडाेर्ले यांचा ज्यांना पाठिंबा असेल तो मात्र नक्की निवडून येईल अशी परिस्थिती आहे.
- गत निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते -
- राजू आनंदा दिंडोर्ले (अपक्ष) - ९४८
- गौरव राजन सावंत (राष्ट्रवादी) - ७३७
-संगीता संजय सावंत (भाजप) - ६९८
- महेश रामचंद्र गायकवाड (कॉंग्रेस) - ५५३
- संजय शंकर राणे (शिवसेना) ४४१
- प्रभागात झालेली कामे -
- मारुती मंदिराजवळ विरंगुळा केंद्र.
- नागरी आरोग्य केंद्राची सुरवात.
- सांस्कृितक हॉलचे बांधकाम प्रगतिपथावर.
- २२ वर्षे रखडलेले क्रीडांगणाची निर्मिती.
- प्रभागात ६० सीसीटीव्ही बसविले
- २५० हून अधिक ट्रीगार्ड बसविले.
- पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.
- रस्ते, गटारी, ड्रेनेजची ८० टक्के कामे पूर्ण.
- प्रभागात सर्वत्र एलईडी बल्ब बसविले.
- प्रभागात शिल्लक राहिलेली कामे -
- रस्ते, गटारी, ड्रेनेज लाईनची वीस टक्के कामे अपूर्ण.
- अनेक वेळा प्रभागातील अनेक कॉलनीत दूषित पाणीपुरवठा.
- रेनवॉटर हार्वेस्टिंग व पाण्याचा पुनर्वापर योजना कोविडमुळे रखडली.
- ऑक्सिजन पार्कचे काम अपूर्ण
कोट - मतदारांनी दिलेल्या संधीचे सोनं करण्याचा माझा प्रयत्न राहिला. चांगली कामे करुनही आता मला उभे राहता येणार नाही. एका चांगल्या उमेदवारास आपण पाठिंबा देऊ. ज्यामुळे माझी अपूर्ण कामे पूर्ण करता येतील.
राजू दिंडोर्ले,