प्रभाग रचनाही संशयाच्या भोवऱ्यात
By Admin | Published: August 5, 2015 12:02 AM2015-08-05T00:02:41+5:302015-08-05T00:02:41+5:30
महानगरपालिका निवडणूक : इच्छुक उमेदवार, नगरसेवकांच्या तक्रारी
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण निश्चित करताना अधिकाऱ्यांनी गंभीर चूक केल्याची बाब समोर येताच शहरात नव्याने तयार केलेले ८१ प्रभागही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भौगोलिक सलगता, प्रगणक यासंबंधीचे नियम डावलून प्रभाग तयार केल्याची सार्वत्रिक तक्रार केली जात आहे. आरक्षण सोडतीला हरकत घेण्यात येणार आहे, तशीच आता उच्च न्यायालयात जाऊन प्रभाग रचनेलाही हरकत घेतली जाण्याची शक्यता आहे.आरक्षणाबाबतची चूक लक्षात आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे फर्मान काढले. त्यातच आता प्रभाग रचनेवरही आक्षेप घेतले जात आहेत. नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांनी प्रभाग रचनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. उघडपणे हरकती घेतल्या जात आहेत. ही प्रक्रिया सदोष असल्याचा आरोप होत आहे.(प्रतिनिधी)
रोजंदारी कर्मचाऱ्यांनी केले नकाशे
शहराची सॅटेलाईट प्रतिमा घेऊन त्याद्वारे प्रभाग करण्याचे काम करण्यात आल्याचे सांगण्यात येते; परंतु ज्यांना शहराचा अभ्यास नाही, गल्लीबोळ, रस्ते माहीत नाहीत, अशा प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांकडून प्रभाग नकाशे तयार करून घेण्यात आले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्यासाठी वापर करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग तसेच नगररचना विभागाकडील अभियंते, सर्व्हेअर किंवा जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे एकूण प्रक्रियेवरच आक्षेप नोंदविले जात आहेत.
न्यायालयात जाण्याची तयारी
प्रभाग रचनेबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी व कॉँग्रेसतर्फे या तक्रारी निवडणूक आयोगाकडे कराव्यात, असे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्षातर्फे अशा तक्रारी एकत्र करण्यात येत आहेत. सर्व तक्रारी घेऊन त्यावर आधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्याचा मनोदय शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी मंगळवारी व्यक्त के ला.
एकाच गल्लीतील घरे
वेगवेगळ्या प्रभागांत
सदर बाजार, विचारे माळ, कदमवाडी, जाधववाडी, राजाराम चौक, गंजी माळ या भागांत अशा घटना घडल्या आहेत. एकाच गल्लीतील समोरासमोर असलेली घरे वेगवेगळ्या प्रभागांत गेली आहेत. काही प्रभागांचा परिसर चालून पूर्ण करायचा म्हटला तर दोन-दोन दिवसही पुरणार नाहीत. विक्रमनगर प्रभाग हा चक्क शिवाजी विद्यापीठसमोरच्या कृषी महाविद्यालयापर्यंत जोडला आहे.
प्रगणक गट फोडलेच
प्रभाग रचना तयार करताना शक्यतो प्रगणक गट फोडले जाणार नाहीत, असे आधी महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले होते. जातनिहाय जनगणनेसाठी हे पाचशे लोकसंख्या असलेले प्रगणक गट तयार करण्यात आले होते. हे अखंड गट प्रभागात जोडले जाणार होते. मात्र, नंतर हे गटही तोडले; त्यामुळे मूळ संकल्पनेला धक्का पोहोचला आहे.