उष्मा वाढला... तापमान ३४ डिग्रीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 03:10 PM2020-02-22T15:10:31+5:302020-02-22T15:12:08+5:30
कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून शुक्रवारी ते ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. आगामी आठ दिवस तापमानात वाढ होत जाणार आहे. हळूहळू तापमानात वाढ होत असून फेबु्रवारीपासूनच हवामान तापू लागल्याने ऐन मार्च, एप्रिलमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, हा उष्मा नागरिकांना घामाघूम करणार हे निश्चित आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून शुक्रवारी ते ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. आगामी आठ दिवस तापमानात वाढ होत जाणार आहे. हळूहळू तापमानात वाढ होत असून फेबु्रवारीपासूनच हवामान तापू लागल्याने ऐन मार्च, एप्रिलमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, हा उष्मा नागरिकांना घामाघूम करणार हे निश्चित आहे.
साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्याकडे तापमानात वाढ होत जाते. एप्रिल आणि मे महिन्यांत पारा ४० डिग्रीपर्यंत पोहोचतो. मात्र यंदा फेबु्वारीच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच तापमानात वाढ होत गेली. शुक्रवारी किमान तापमान १६ डिग्री, तर कमाल तापमान ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले होते. पहाटेपासून काहीसे गार वारे वाहत असले तरी सकाळी आठनंतर हळूहळू अंग तापू लागते.
दहानंतर घराबाहेर पडले तर अंगातून घामाच्या धारा येत राहतात. दुपारी बारा ते दोनपर्यंत तापमानात वाढ होत जाते. दुपारी दोन वाजता पारा ३४ डिग्रीपर्यंत पोहोचल्यानंतर अंग भाजू लागते. दुपारी घराबाहेर पडल्यानंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुचाकीवरून जाणाऱ्यांचे ‘सनकोट’, स्कार्फ, टोप्या बाहेर पडल्याचे दिसते. दुपारी तीननंतर पारा हळूहळू खाली येत जातो. सायंकाळी पाचनंतर वातावरण पुन्हा गार होत जाते.
किमान तापमान नियंत्रणात
कमाल तापमानात वाढ झाली असली तरी अद्याप किमान तापमान नियंत्रणात आहे. किमान तापमान १६ डिग्रीपर्यंत असल्याने सकाळी व रात्री फारसा उष्मा जाणवत नाही. मात्र पुढील आठवड्यापासून किमान तापमानातही वाढ होत असून ते २१ डिग्रीपर्यंत पोहोचणार आहे.
ऊसतोडणी मजुरांचा त्रास वाढला
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शिल्लक ऊस आहे तो अडचणीतील आहे. सकाळी आठनंतर उष्मा वाढत जात असल्याने ऊसतोडणी मजुरांना त्याचा त्रास होत आहे.
पिकांची पाण्याची मागणीही वाढली
तापमानवाढीचा परिणाम शेतीवरही झाला असून, पिकांची पाण्याची मागणीही वाढली आहे. जमीन तापू लागल्याने ऊस, भुईमूग, उन्हाळी भाताला जास्त पाणी लागत आहे.