रुकडी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:25 AM2021-05-26T04:25:35+5:302021-05-26T04:25:35+5:30
: बोगद्यातील पावसाच्या साठणाऱ्या पाण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने तातडीने करावी अन्यथा रुकडी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ...
: बोगद्यातील पावसाच्या साठणाऱ्या पाण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने तातडीने करावी अन्यथा रुकडी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रुकडी (ता. हातकणंगले)चे माजी उपसरपंच शीतल खोत व शमुवेल लोखंडे यांनी कोल्हापूर रेल्वेस्टेशन प्रबंधक ए. आय. फर्नांडिस यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
रुकडी येथील रेल्वेस्टेशन हे गावाच्या मध्यभागी असल्यामुळे या लोहमार्गामुळे गाव दोन भागांमध्ये विभागले असून गावातून ये-जा करण्यासाठी या मार्गाचा वापर करावा लागतो. तसेच हा मार्ग जवळपास सात ते आठ गावांना जोडणारा असून, प्रमुख बाजारपेठेकडे जाणारा मार्ग आहे. रेल्वे प्रशासनाने पूर्वीच मार्ग बंद करून नवीन बोगदा मार्ग तयार केलेला आहे. या बोगद्याची लाइट
व्यवस्था, दोन्ही बाजूंना संरक्षक भिंती, सांडपाण्याची व्यवस्था व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची योग्य ती व्यवस्था न करता बोगदा मार्ग खुला केला आहे. या बोगद्यामध्ये पावसाचे तसेच सांडपाणी दीड ते दोन फूट इतके साचत असून, नागरिकांना त्या पाण्यातून येणे-जाणे करावे लागत आहे. तसेच भविष्यात येथे पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यताही आहे, तरी रेल्वे प्रशासनाने दुसरा
पर्यायी रस्ता तयार करावा, अन्यथा बोगद्यामध्ये जो पाणीसाठा राहतो त्या पाण्याचा जलद गतीने निचरा होण्याची व्यवस्था ताबडतोब करावी.
या निवेदनाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा रुकडी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शीतल खोत व शमुवेल लोखंडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर संतोष जाधव, महंमद काझी, चंद्रकांत पोळ, सुनील खोत, कुमार पोळ आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.