गडहिंग्लजकरांनो सावधान, पाऊस होतोय निम्मा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:36 PM2018-06-12T23:36:14+5:302018-06-12T23:36:14+5:30
गेल्या दोन वर्षांपासून गडहिंग्लज तालुक्यातील सरासरी पाऊसमान कमी होत आहे. यावर्षी मान्सूनच्या पावसाची सुरुवात वेळेवर झाली म्हणून काही मंडळी सुखावली असली तरी, शेतकरी मात्र चिंतेत आहे.
राम मगदूम।
गडहिंग्लज : गेल्या दोन वर्षांपासून गडहिंग्लज तालुक्यातील सरासरी पाऊसमान कमी होत आहे. यावर्षी मान्सूनच्या पावसाची सुरुवात वेळेवर झाली म्हणून काही मंडळी सुखावली असली तरी, शेतकरी मात्र चिंतेत आहे. विशेषत: हलकर्णी परिसर हा तालुक्याच्या पूर्वेकडील भाग अलिकडे दुष्काळी छायेत गेला आहे; म्हणूनच गडहिंंग्लजकरांनी सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे; मात्र, ९५ टक्के शेतकरी अल्प भू-धारक व अत्यल्प भू-धारक आहेत. त्यामुळे शेती, शेतमजुरी आणि दुग्धव्यवसाय यावरच त्यांची गुजरान अवलंबून आहे. अलिकडील दशकात चित्रीच्या पाण्यामुळे हिरण्यकेशी नदी बारमाही झाली तरी चित्रीच्या पाण्यालाही मर्यादा पडत आहेत.
प्रामुख्याने ऊस, सोयाबीन, भुईमूग, मिरची व ज्वारी हीच पीके तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. चित्रीच्या पाण्यामुळे हिरण्यकेशी नदीकाठच्या गावात ऊस क्षेत्रात अलिकडे वाढ झाली असली तरी उर्वरित पिके पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत; त्यामुळेच वर्षागणिक कमी होणाऱ्या पावसामुळे ऊस उत्पादकांसह सर्वच शेतकरी व शेतमजूर चिंतेत आहेत.
गेल्या १० वर्षांतील तालुक्यातील सरासरी पर्जन्यमानावर नजर टाकल्यास दुष्काळी तालुक्याकडे आपली वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होते. अलिकडील १० पैकी ५ वर्षांतील पाऊस सरासरी १ हजार मिली लिटरच्या खालीच आहे. २०१५-१६ मध्ये सरासरी केवळ ५२१ मिली लिटर इतकाच पाऊस झाला; त्याचवेळी आपल्याला धोक्याचा इशारा मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवरच गतवर्षीपासून तालुक्यात पाणीप्रश्नावरील चर्चा सुरू झाली आहे. दोन दशकांपासून रखडलेले उचंगी, आंबेओहळ, सर्फनाला या प्रकल्पांच्या पूर्ततेच्या मागणीने उचल खाल्ली आहे.
चित्री प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या मागणीबरोबरच कर्नाटकातील हिडकल जलाशयाचे पाणी तेरणी-नरेवाडी तलावात आणण्याची मागणी सुरू झाली आहे. त्याला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याची गरज आहे.
कर्नाटकप्रमाणे तलाव पुनर्रभरणाची गरज
1 दरवर्षी पावसाळ्यात वाहून जाणाºया हिरण्यकेशी नदीच्या पाण्याने २२ तलाव पुनर्रभरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प कर्नाटक सरकारने गडहिंग्लज लगतच्या हुक्केरी तालुक्यात राबविला आहे. त्या धर्तीवर शासनातर्फे गडहिंग्लज तालुक्यातही असा प्रकल्प राबविणे आवश्यक आहे; त्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आहे.
2 बटकणंगले येथे लोकसहभाग व श्रमदानातून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी चरी खुदाई, दगडी बांधबंदिस्ती, वनराई बंधारे आणि नाले-ओढ्यांच्या सफाईची मोहीम सुरू आहे. त्याप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक गावात पाऊस साठविण्याची चळवळ सुरू करण्याची गरज आहे.
3 लोकसहभागातून जलयुक्त शिवार
योजना यशस्वीरित्या राबविण्याबरोबरच विहिरी आणि कुपनलिकांचे पुनर्रभरण व प्रत्येक कुटुंबाने पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये सक्रिय सहभागी होण्याची गरज आहे.
चित्रीचे पाणी केवळ पिण्यासाठीच..!
गेल्या दहा वर्षांतील पाऊसमान विचारात घेता यापुढेही अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात चित्रीचे पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याची वेळ येईल, असे जाणकारांचे मत आहे.