कोल्हापुरात विळखा, सोलापूरला इशारा; राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 07:05 AM2024-07-27T07:05:19+5:302024-07-27T07:05:31+5:30
पंचगंगा ४५.५ फुटांवर, मराठवाड्यात हुलकावणी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ८३ मार्गांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर / सोलापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचा विळखा अद्याप कायम आहे. ‘राधानगरी’चे पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने पंचगंगा ४५.५ फुटांवरून वाहत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ८३ मार्गांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. निम्मा जिल्हा पुराच्या पाण्याने वेढल्याने दूध, भाजीपाला आवकेसह जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातही सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसामुळे भीमा व सीना नदीला पूर येण्याची शक्यता गृहित धरून १०५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगली : कृष्णेची पातळी ३८ फुटांवर
शुक्रवारी सकाळी सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दुपारी १२ वाजेपर्यंत ३८ फुटांवर गेली होती. अनेक कुटुंबांनी स्थलांतर सुरू केले होते. दुपारपासून पावसाने उघडीप दिली. कोयना धरणातून ३२ हजार १०० क्युसेकने विसर्ग चालू आहे.
सातारा : जिल्ह्यात पाच दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंदावला आहे. २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला २६७ मिमी तर कोयनानगर येथे १९८ मिलीमीटर झाला. दरम्यान, कोयना धरणातील पाणीसाठा ८१ टीएमसीवर पोहोचला आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यातील नद्या अजूनही ‘ओव्हरफ्लो’
आहेत. काही दिवसांत झालेल्या पावसामुळे नद्या, नाले भरलेले आहेत. खेडमधील जगबुडी, संगमेश्वरमधील शास्त्री आणि राजापूरमधील कोदवली नदी दुथडी वाहत आहेत. या नद्या सध्या इशारा पातळीवरच आहेत.
छत्रपती संभाजीनगर दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे चार तालुक्यांतील २७२ गावांची तहान ३५५ टँकरद्वारे भागवली जात आहे. अजुनही जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही.
हिंगोली : औंढा नागनाथमधील सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने दिसाला.
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील नद्यांना पूर आला असून रंगावली नदीचे पाणी सखल भागात शिरल्याने ४०० घरे बाधित झाली आहेत. नेसू नदीच्या पुरात एक जण वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. तालुक्याच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दोन दिवस पावसाची अधूनमधून संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीपातळीत वाढ झाली असून, आता जिल्ह्यातील २२ धरणे १०० टक्के भरली आहेत. सर्वांत मोठ्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
‘पुणे : पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम घ्या’
पुण्यात गुरुवारच्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचेती पुलाजवळील पाटील इस्टेट, एकतानगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांत पाणी शिरल्याने चिखल आणि घाण पसरली आहे. घरांमधील चिखलाची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला दिले. पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.