वनपालाची रायफल चोरट्यांनी पळविली!

By admin | Published: May 19, 2015 12:54 AM2015-05-19T00:54:46+5:302015-05-19T00:55:28+5:30

सांगलीतील घटना : अष्टविनायक नगरमधील घरातून चोरी

Warp Rifle ran away with thieves! | वनपालाची रायफल चोरट्यांनी पळविली!

वनपालाची रायफल चोरट्यांनी पळविली!

Next

सांगली : वन विभागातील वनपाल रावसाहेब राजाराम चौगुले (वय ५२) यांचे विश्रामबाग येथील अष्टविनायक नगरमधील घर फोडून चोरट्यांनी एसएलआर (सेल्फ लोडेड रायफल) ही रायफल पळवून नेली आहे. सोमवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे ही रायफल वन विभागाची आहे. ती कार्यालयात जमा न करता चौगुले घरी घेऊन जात होते, अशी माहिती चौकशीतून उघडकीस आली आहे. चौगले हे कुपवाडच्या वन विभाग कार्यालयात गार्ड या पदावर नेमणुकीस आहेत. ४ आॅगस्ट २०१४ रोजी त्यांच्याकडे वनपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी व शुक्रवारी त्यांनी रजा काढली होती. कुटुंबासह ते सांगोल्याला गेले होते. शनिवारी ते कामावर हजर राहिले नाहीत. रविवारी सुट्टी असल्याने ते आले नाहीत. सोमवारी सकाळी ते सांगोल्याहून एकटेच सांगलीत आले. घरी गेल्यानंतर त्यांना, चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी व कोयंडा उचकटल्याचे दिसून आले. कपाटातील साहित्य विस्कटलेले होते. मात्र घरात किमती ऐवज नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. पण घरात रायफल नसल्याचे चौगुले यांच्या लक्षात आले. त्यांनी घरात शोध घेतला. त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलिसांशी संपर्क साधला.
जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत, उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक विश्वनाथ घनवट, संजयनगर ठाण्याचे रवींद्र डोंगरे यांनी चौगुले यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. सावंत यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी चौगुले यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. ते ज्याप्रकारे माहिती देत आहेत, त्यामध्ये विसंगती आढळून येत आहे. यामुळे रायफलची चोरी झाली आहे की नाही, याबद्दल संशय व्यक्त होत आहे.
ही रायफल वन विभागाच्या मालकीची आहे. ड्युटी संपल्यानंतर ती कार्यालयात जमा न करता चौगुले ती घरी नेत होते, अशी माहिती पुढे आली आहे. श्वानपथकास पाचारण केले असता, श्वान घरापासून काही अंतरावर घुटमळले. (प्रतिनिधी)

कोम्बिंग आॅपरेशन
रायफल चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सायंकाळी गोकुळनगर, इंदिरानगर, वडर कॉलनी परिसरात कोम्बिंग आॅपरेशन केले. रेकॉर्डवरील ११ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. घरांची झडती घेतली. घरफोडीतील गुन्हेगार अर्जुन अशोक धायगुडे (वय २३, रा. कुपवाड) व सचिन राम गोसावी (१८, इंदिरानगर) यांना अटक केली आहे.

Web Title: Warp Rifle ran away with thieves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.