वरुटेंवर फौजदारीचा ठराव
By admin | Published: November 23, 2014 10:47 PM2014-11-23T22:47:13+5:302014-11-23T23:55:56+5:30
शिक्षक संघ महामंडळ सभा : लेटरपॅडचा गैरवापर केल्याचा आरोप; दुफळी निर्माण केल्याची टीका
कोल्हापूर : शिक्षक बॅँकेचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांचा शिक्षक संघाशी दुरान्वयेही संबंध नसताना त्यांनी संघाचे बेकायदेशीर लेटरपॅड वापरून गैरवापर सुरू केला आहे. याबद्दल त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा ठराव प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय महामंडळात करण्यात आला.
यावेळी वरुटे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करत हिंमत असेल तर त्यांनी ३३ जिल्ह्यांत जाऊन महामंडळ सभा घेऊन दाखवावी, असे उघड आव्हानही शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी यावेळी दिले. भाजपचे महासमन्वयक वसंत वाणी प्रमुख उपस्थित होते.
शिक्षक संघाची महामंडळ सभा आज, रविवारी कोल्हापुरात झाली. स्वागतामध्येच संघाचे जिल्हाध्यक्ष एस. व्ही. पाटील यांनी वरुटे यांच्या कारनाम्याचा पंचनामा करण्यासाठीच कोल्हापुरात महामंडळ सभा आयोजित केल्याचे स्पष्ट केले. संघाचा फायदा घेऊन राज्याचे नेतृत्व केले, त्याच संघात दुफळी निर्माण करण्याचे पाप वरुटे करत असून, या प्रवृत्तीच्या जिल्ह्यातच मुसक्या आवळल्या जातील, असे सांगत संघाच्या नावाचा गैरवापर करत असल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा ठराव एस. व्ही. पाटील यांनी मांडला.
राज्याध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या वरुटेंना गडचिरोलीतील रस्ते माहिती आहेत का? ज्यांनी मोठे केले, त्यांनाच पायाखाली घेण्यास निघालेल्या वरुटेंची कोल्हापुरातच कोल्हेकोई सुरू आहे, अशी टीका शिक्षक नेते एन. वाय. पाटील यांनी केली. स्वार्थासाठी संघटना फोडणाऱ्यांनी आम्हाला तोरा शिकवू नये. दोन वर्षांपूर्वी वरुटे कोठे होते, याचे आत्मचिंतन करावे, असे आवाहन करत आजपर्यंत कोणत्याही पदासाठी संघटनेचे काम केले नाही. शिक्षक व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच प्रयत्न केल्याने राज्यातील शिक्षकांचा आपणावर विश्वास असल्याचे संघाचे मार्गदर्शक प्रा. एस. डी. पाटील यांनी सांगितले. शिक्षक बॅँक लुटणाऱ्यांना कोल्हापूरकर येथे गाडतील, असे संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी सांगितले.
वरुटे व वसंत हारुगडे यांचे नाव घेण्याइतकेही ते लायकीचे नाहीत. एकही जिल्हाध्यक्ष बरोबर नसताना रोज उठून शिक्षक संघाची बदनामी करणाऱ्या वरुटेंनी हिंमत असेल तर ३३ जिल्ह्यात जाऊन महामंडळ सभा घ्यावी, असे उघड आव्हान संभाजीराव थोरात यांनी केले.
रोडक्या मल्लांशी कुस्ती कसली?
कोल्हापूरकरांनी राजाराम वरुटे यांना नाका-तोंडात माती जाईपर्यंत चारी मुंड्या चीत केले आहे. वरुटे हा कोल्हापूर जिल्ह्यापुरता विषय असल्याने महामंडळ सभेत त्यांच्यावर चर्चा करून रोडक्या मल्लांशी कसल्या कुस्ती खेळता, असे सांगत शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करा, अशी सूचना पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी केली.
खालच्या पातळीवर जाऊन टीका
वरुटेंनी आजपर्यंत स्वार्थी राजकारण केलेच; त्याचबरोबर लग्न करतानाही पैशासाठी एका वेडसर मुलीशी लग्न केले, अशी खालच्या पातळीवर जाऊन शिक्षक बॅँकेचे माजी अध्यक्ष विलास पाटील यांनी टीका केली; पण याबद्दल सभेतच उलटसुलट चर्चा होती.