पुरती शोभाच झाली म्हणायची की!

By admin | Published: August 11, 2016 12:17 AM2016-08-11T00:17:14+5:302016-08-11T00:22:48+5:30

नेमकं वर्ष आता आठवत नाही. पण बरीच वर्षे झाली हे नक्की. एका इंग्रजी दैनिकात एक चांगलं तीन कॉलमी व्यंगचित्र छापून आलं होतं.

That was said to be fair! | पुरती शोभाच झाली म्हणायची की!

पुरती शोभाच झाली म्हणायची की!

Next

नेमकं वर्ष आता आठवत नाही. पण बरीच वर्षे झाली हे नक्की. एका इंग्रजी दैनिकात एक चांगलं तीन कॉलमी व्यंगचित्र छापून आलं होतं. त्यात मुंबईचा तेव्हांचा विमानतळ दाखविला होता. आॅलिम्पिक स्पर्धेसाठी विदेशात गेलेला भारतीय चमू मायदेशी परतणार होता. कोणताही खेळाडू किंवा खेळाडूंचा संघ मायदेशी परततो तेव्हां विमानतळावर रेटारेटी करायची आणि संघ विजय प्राप्त करुन येत असेल तर त्याचे स्वागत ‘बुकें’नी करायचे आणि पराभूत होऊन परतत असेल तर स्वागत बुक्क््यांनी करायचे ही महान परंपरा अजून सुरु व्हायचीच होती. शुकशुकाटलेल्या विमानतळावर आॅलिम्पिकचा संघ उतरला आणि कस्टमच्या अधिकाऱ्यासमोर ओळ करुन उभा राहिला. अग्रभागी संघाचा कप्तान होता. सवयीप्रमाणे अधिकाऱ्याने त्याला प्रश्न केला, ‘एनीथिंग टू डिक्लेअर’? म्हणजे येताना काही मौल्यवान वस्तू वगैरे आणलं असेल तर जाहीर करायचंय? बिचारा कप्तान ओशाळवाणे हसून उत्तरला, ‘नथींग सर, नॉट इव्हन अ ब्रॉन्झ’! (काहीही नाही, महोदय, अगदी कांस्य पदकदेखील नाही). याचा अर्थ भारतीय खेळाडू जसे जायचे तसेच हात हलवित परत यायचे. पण तेव्हांच्या आणि आताच्या कथेत नाही म्हणायला थोडा फरक नक्कीच पडला आहे. खाशाबा जाधव या कुस्तीगीरानं हेलसिंकी आॅलिम्पिकमध्ये मल्लविद्येत प्राप्त केलेल्या कांस्य पदकाच्या शिदोरीवर देशाने बरीच वर्षे काढली. त्यानंतर हळूहळू ही शिदोरी वाढत गेली आणि कोणत्या खेळात, कोणी, केव्हां आणि कोणते पदक प्राप्त केले हा प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये आवर्जून विचारला जाऊ लागला. पण तरीही देशाची लोकसंख्या आणि प्राप्त पदकांची संख्या यातील व्यस्त प्रमाणात गुणात्मक फरक पडला असे काही झालेले नाही. नजीकच्या भविष्यात तसे होण्याची चिन्हेही दिसत नाहीत. अशातच शोभा डे यांनी ‘रिओ जाव, सेल्फी लो, खाली हाथ वापस आओ, व्हॉट अ वेस्ट आॅफ मनी अ‍ॅन्ड आॅपॉर्च्युनिटी’ असे ट्विट केले आणि त्यांना अनेकांनी अक्षरश: बदडून काढले व या बदडण्याने शोभाताईंनी स्वत:ची पुरती शोभा करुन घेतली. राज्यघटनेने केवळ तात्त्विक अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले. पण अलीकडच्या काळात सुळसुळाटलेल्या समाज माध्यमांनी मात्र व्यावहारिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक विषयात मत आहे आणि आपण ते मांडलेच पाहिजे अशी सुरसुरीही आहे. तेव्हां शोभा डे यांनी त्यांच्या सुरसुरीला मोकळी वाट करुन दिल्यावर बाकीच्यांनी मागे हटायचे काही कारणच नव्हते. त्यातून एक पोक्त, समंजस आणि परिपक्व विचारसरणीची नागरिक अशी शोभा डे यांची ख्याती असल्याची साधी अफवादेखील आजवर कोणाच्या कानी पडलेली नाही. पण तरीही एकदा का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार अमर्याद आहे आणि तो सर्वांना सर्वकाळ उपलब्ध आहे असे सर्वमान्य झाल्यावर कुणी शोभा आपली शोभा करुन घेणार आणि बाकी सारे तिची शोभा करण्यात धन्यता मानणार हे ओघानेच येते. पण तरीही यावेळी या बाई ज्या टिवटिवल्या आहेत ते कदाचित नसेल पूर्ण सत्य पण ते पूर्ण असत्यदेखील नाही. बिरबल बादशहाच्या गोष्टीतील बादशहाचा पोपट ध्यानस्थ वगैरे काही बसलेला नाही तो चक्क मेला आहे हे कोणी तरी सांगावेच लागते. सव्वाशे कोटींहून अधिकची लोकसंख्या असलेल्या देशातील जेमतेम शे-सव्वाशेच खेळाडू जर आॅलिम्पिकसारख्या स्पर्धेसाठी पाठविले जाऊ शकत असतील तर देशभक्तीच्या नावाने गळे काढणे याला अर्थ नाही. अश्व शर्यतींमध्ये ‘आॅल्सो रन’ म्हणजे शर्यतीत हेदेखील धावले असे जाहीर करण्याची परंपरा असते. त्या न्यायाने पदक किंवा पदके मिळणे तर दूर, पण या ‘आॅल्सो रन’मध्ये तरी अशी कितीशी नावे येतात? जेणेकरुन आपल्या खेळाडूंचा तेजोभंग होऊ नये, त्यांना सदैव प्रोत्साहित करावे, सतत त्यांचा हुरुप वाढवावा हे सारे ठीक. परंतु कुठपर्यंत? केवळ आॅलिम्पिकच नव्हे तर कोणत्याही आंतराराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू धाडायचे तर त्याआधी मोठे नाट्य घडून येत असते. वशिलेबाजीचे आरोप होत असतात. खिलाडू वृत्ती हा एक मोलाचा गुण म्हणून सांगितले जाते, त्याचा खुद्द खेळाडूंमध्येच किती अभाव असतो याचे दर्शन घडविले जाते. रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुशीलकुमार सोळंकी आणि नरसिंग यादव हे दोन मल्ल आणि त्यांचे जे कोणी असतील ते वस्ताद यांच्यात जे काही घडले आणि नरसिंग यादव अपात्र ठरावा म्हणून त्याच्या आहारात म्हणे कोणी अज्ञाताने अंमली पदार्थ मिसळल्यानंतर जे आरोप प्रत्यारोप सुरु झाले, त्यातून देशाची इभ्रत वाढली की देशभक्तीला खतपाणी मिळाले? त्याच्याही आधी देशाच्या क्रीडा विश्वाच्या इतिहासात प्रथमच हे दोन्ही मल्ल न्यायालयाच्या आखाड्यातही उतरुन आले होते. मुद्दा काय, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताना शोभा डे जे टिवटिवल्या ते असेलही खरं पण बरं नव्हतं हे नक्की!

Web Title: That was said to be fair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.