विशाळगडावर दंगल होईपर्यंत वाट बघण्याचा दबाव होता का? मविआचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

By इंदुमती सूर्यवंशी | Published: July 16, 2024 08:43 PM2024-07-16T20:43:40+5:302024-07-16T21:20:31+5:30

महाविकास आघाडीच्या नेत्यांची जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा

Was there pressure to wait until the riots at Vishalgad MVA question to the district collector | विशाळगडावर दंगल होईपर्यंत वाट बघण्याचा दबाव होता का? मविआचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

विशाळगडावर दंगल होईपर्यंत वाट बघण्याचा दबाव होता का? मविआचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

इंदुमती सूर्यवंशी, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: विशाळगड अतिक्रमण मोहिमेचा विषय ४ तारखेपासून सुरू होता, पुणे पोलीसांनी तेथून मोठा जमाव विशाळगडावर येणार असल्याचे कळवूनही पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला नाही. विशाळगड, गजापूरातील परिस्थिती हाताळण्यात पोलीस प्रशासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली, त्यांच्यावर दंगल होईपर्यंत वाट बघण्याचा दबाव होता का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला.

रविवारी विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी माहिमेमुळे गजापूर व मुस्लिमवाडी येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी महाविकास आघाडी व शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांची भेट घेतली. यावेळी खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, मुस्लिम बोर्डींगचे चेअरमन गणी आजरेकर, ॲड, बाबा इंदुलकर, सतिशचंद्र कांबळे, दिलीप पवार, मेघा पानसरे, भारती पोवार, गिरीश फोंडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, पुण्याहून १०० -१५० गाड्या घेऊन जमाव आला होता त्यांना कोल्हापुरातच का रोखले नाही, आम्हाला आज अडविण्यासाठी जेवढा पोलीसांचा फौजफाटा पाठवला होता तेवढा त्यावेळी दिला असता, संभाजीराजेंना कोल्हापुरात पंचगंगा पुलावरच थांबवले असते तर आज ही वेळ आली नसती. खालच्या स्थानिक नागरिकांनी सुरक्षा मागूनही पोलीसांनी पुरेसा बंदोबस्त दिला नाही. जिल्हा प्रशासनाने मोहिम थांबविण्यासाठी प्रयत्न केले नाही.

बाबा इंदुलकर म्हणाले, या लोकांना अयोध्येसारखी दंगल कोल्हापुरात पेटवायची आहे. या प्रकारामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. व्हिडिओ बघून त्यात दिसणाऱ्या समाजकंटकांवर कलम १५२ अंतर्गत कारवाई करा. सतिशचंद्र कांबळे म्हणाले, बातमीसाठी आलेल्या पत्रकारांना गडावर जाण्यापासून रोखले. त्यांना भांडत, पोलीसांच्या लाठ्या खात वर जावे लागले. मेघा पानसरे यांनी तेथे महिला व मुलींना असुरक्षित वाटत असून त्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. गिरीश फोंडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बदलीची व अतिक्रमण काढण्याची कारवाई थांबवण्याची मागणी केली. आर. के. पोवार यांनी ही दंगल नियोजित असल्याचा आरोप केला.
--

पन्हाळा-पावनखिंड मोहिमांचे कारण
आंदोलकांना का अडवले नाही यावर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली म्हणाले, सध्या नियोजित पन्हाळा-पावनखिंड मोहिमा सुरू आहेत, ट्रेकर्स व पर्यटकांना सोडणे भाग होते. त्यामुळे आंदोलक येथे मोठ्या प्रमाणात आले. त्यावर सतेज पाटील म्हणाले, ट्रेकर्सना वस्तुस्थिती सांगून रोखता आले असते.

---
गडावर जमाव जाऊ न देणे महत्वाचे होते...

प्रश्नांच्या सरबत्तीवर उत्तरे देताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, गडावर दर्गा, मशीद असल्याने तेथे जमावाला जाऊ न देणे महत्वाचे होते.त्यामुळे सगळ्यांनी तिथे लक्ष केंद्रित केले. . शिवाय एकाचवेळी दोन वेगवेगळे जमाव आले. एका जमावाला गडावरून खाली पाठवताना दुसऱ्या जमावाला वर येऊ द्यायचे नव्हते, संभाजीराजेंच्या मागे मोठा पोलीस फौजफाटा गडावर गेला. तेथे मोबाईल नेटवर्क नसल्याने गडाच्या खाली काय होत आहे हे कळायला मार्ग नव्हता, पण कळाले तेंव्हा लगेच पोलीस खाली आले. पोलीसांनी दंगल रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण जमाव खूप आक्रमक झाला होता.
--

जेवण, कपड्यांची मदत पुरवा
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, गेल्या वर्षभरात अशा मोठ्या घटना दोनवेळा घडल्या असतानाही या प्रकरणात पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतली. महिला व मुलींना जंगलात पळून जावे लागले. नागरिकांना आता राहायला जागा नाही, अन्न शिजवायला गॅस, सिलिंडर नाही, घालायला कपडे नाहीत, त्यांची घरे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे तातडीने त्यांना कपडे व जेवणाची व्यवस्था करा. राहण्यासाठी निवारा केंद्रे उभारा. अशा घटना पून्हा घडणार नाहीत याची काळजी घ्या.

--
मदत करणाऱ्यांना अडवू नका

सतेज पाटील म्हणाले, जे व्हायचे ते घडले, हा प्रकार आता जगभर पोहोचला आहे. ज्यावेळी लोकांना अडवायचे होते त्यावेळी तर अडवले नाही. आता नागरिकांना तातडीने मदतीची गरज आहे. त्यांच्यासाठी मदत व जेवण घेऊन जाणाऱ्यांना, नातेवाईकांना थांबवू नका. त्यांची ही मागणी मान्य करत जिल्हाधिकाऱ्यांनी मदत करण्यासाठी कुणालाही अडवणार नाही असे सांगितले.

Web Title: Was there pressure to wait until the riots at Vishalgad MVA question to the district collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.