सांगली जिल्हत धोऽऽ डाला--वारणेला पूर, कृष्णा दुथडी

By admin | Published: July 23, 2014 10:57 PM2014-07-23T22:57:07+5:302014-07-23T23:00:37+5:30

शिराळा तालुक्यात अतिवृष्टी : मांगले-काखे पूल पाण्याखाली; दहा गावांचा संपर्क तुटला

Washable in Sangli district - Varnala flood, Krishna Duthadi | सांगली जिल्हत धोऽऽ डाला--वारणेला पूर, कृष्णा दुथडी

सांगली जिल्हत धोऽऽ डाला--वारणेला पूर, कृष्णा दुथडी

Next

सांगली : चांदोली (वारणा) धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १९९ मिलिमीटर पाऊस झाला. सलग सात दिवस याठिकाणी अतिवृष्टी सुरू आहे. शिराळा तालुक्यातही ९१ मिलिमीटर पाऊस झाल्याने अतिवृष्टी नोंदली गेली. त्यामुळे वारणा नदीला पूर आला आहे. शिराळा तालुक्यातील मांगले-काखे पूल पाण्याखाली गेला असून, शिराळा, वाळवा तालुक्यातील चार बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला आहे़ दुष्काळी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून, कृष्णा नदीही दुथडी भरून वहात आहे़
शिराळा/मांगले/चरण : शिराळा तालुक्यास आज (बुधवार) दुसऱ्यादिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. शिराळा, कोकरूड, चरण, मांगले, सागाव, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धरण परिसरात १९९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, धरण ६६ टक्के (२२.३६ टीएमसी) भरले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्हे जोडणारा महत्त्वाचा वारणा नदीवरील मांगले-काखे पूल मंगळवारी रात्री पाण्याखाली गेल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. तसेच याच नदीवरील मांगले-सावर्डे हा बंधाराही पाण्याखाली गेला आहे.
शिराळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने लहान-मोठे ओढे भरुन वाहू लागले आहेत. मांगले-काखे पुलावर दहा फूट पाणी वाहत असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प असून, वाळवा तालुक्यातील चिकुर्डे मार्गावरून वाहतूक सुरू आहे. यामध्ये कोल्हापूर, वारणानगर, पेठवडगाव येथे जाणाऱ्या विद्यार्थी व कामगारांचे हाल होत आहेत. शिराळा आगाराने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी चिकुर्डे या लांबच्या पर्यायी मार्गाने एसटी वाहतूक बुधवारपासून सुरू केली आहे. मात्र जादाचे अंतर व खराब रस्त्यातून कामगार व प्रवाशांना मार्गक्रमण करावे लागत आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्हे जोडणारा मांगले-काखे पूल वारणा नदीच्या पात्रातच बांधला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की या पुलावरून पाणी वाहते व कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटतो.
शिरशी मंडलात ५१ मि.मी. एकूण १९६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे मंडल वगळता सर्व मंडलात अतिवृष्टीची नोंद आहे. चरण, काळुंद्रे, आरळा, मणदूर येथील ओढ्यांना पूर आला आहे.

-वाळवा : नागठाणे बंधारा मंगळवारी रात्री उशिरा पाण्याखाली गेला. त्यामुळे नागठाणे ते शिरगाव, नागराळे, बुर्ली, रामानंदनगर, किर्लोस्करवाडी, कुंडल, पलूस या मार्गावरील वाहतूक बुधवारी ठप्प झाली होती.
-कृष्णा नदीचे पाणी वाळव्याजवळील कोटभाग, हाळभागला जोडणाऱ्या खेडकडील ओढ्यातून बाहेर पडून ओढ्यावरील पुलाच्या कमानींना पाणी भिडले आहे. या पुलाजवळील जातकरांच्या पालातून सायंकाळपर्यंत पाणी शिरण्याची शक्यता असल्याने त्यांनी स्थलांतर सुरू केले आहे. ४कृष्णेच्या पाण्याने जोतिबा, हनुमान, दत्त मंदिराच्या पश्चिमेस वेढा दिला आहे. वाळवा-जुनेखेड या मार्गावरील फरशी पूल पाण्याखाली जाऊन, रात्रीपासून वाळवा-जुनेखेड, मसुचीवाडी, पुणदी, पुणदीवाडी, दुधोंडीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूकही बंद होण्याची चिन्हे आहेत. नागठाणे बंधाऱ्याजवळील शिरगाव हद्दीत संतोष पाटील यांची भेंडीची शेती पाण्याखाली गेली आहे.

वाळवा तालुक्यात पावसाची संततधार
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीपासून मान्सून पावसाने सुरुवात केली होती. मंगळवारी व बुधवारी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या. आज सकाळी ८ वाजेपर्यंत कासेगाव व तांदुळवाडी मंडलात २४ तासात ५८ मि.मी. पावसाची नोंद झाली. पेठेत ५७, तर इस्लामपूरमध्ये ५५ मि.मी. इतकी नोंद झाली. वाळवा तालुक्यात मंडलनिहाय झालेला गेल्या २४ तासातील पाऊस असा- इस्लामपूर (५५ मि.मी.), ताकारी (११), वाळवा (१४), आष्टा (४९), बहे (१६), तांदुळवाडी (५८), कोरेगाव (४६), पेठ (५७), कुरळप (११.८), कासेगाव (५८) व कामेरी (३२). सलग तिसऱ्या दिवशीही पावसाच्या मुसळधार सरी कोसळत राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. (वार्ताहर)
कडेगाव तालुक्यात तलावांच्या पातळीत वाढ
शाळगाव : कडेगाव तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून शेतकरी सुखावला आहे. शाळगावसह संपूर्ण कडेगाव तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे यांना कमी-अधिक प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. शाळगाव, करांडेवाडी, शि. नगर, कडेगाव या तलावातील पाणी पातळीत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
जत तालुक्यात तुरळक सरी
जत : जत शहर व परिसरात आणि संपूर्ण तालुक्यात आज तुरळक प्रमाणात पाऊस झाला. हा पाऊस उन्हाळी पिकासाठी उपयुक्त आहे. परंतु चारा व पाणीटंचाई कमी होण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे. तुरळक पावसामुळे जमिनीत काही प्रमाणात ओल तयार झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग खरीप पेरणी करु लागला आहे.
तासगावात संततधार
तासगाव : तासगाव शहरासह तालुक्यात आज (बुधवार) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. या पावसाने शिवारात पाणी साचले आहे, तर ओढ्या, नाल्यांनाही पाणी आल्याचे चित्र आहे. सकाळपासून सुरू असणारी पावसाची रिपरिप रात्रीपर्यंत सुरूच होती. शहरात रस्त्यात पाणी साचून राहिल्याने वाहतुकीला अडथळा झाला.

Web Title: Washable in Sangli district - Varnala flood, Krishna Duthadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.