झळाळीच्या प्रतीक्षेत भग्नावशेष !

By admin | Published: March 1, 2017 11:46 PM2017-03-01T23:46:23+5:302017-03-01T23:46:23+5:30

इथं इतिहास झाकोळला : जिल्ह्यातील गड-कोटांच्या डागडुजीसाठी आता उठाव होण्याची गरज

Waste awaiting light! | झळाळीच्या प्रतीक्षेत भग्नावशेष !

झळाळीच्या प्रतीक्षेत भग्नावशेष !

Next


सातारा : राष्ट्रमाता जिजाऊ अन् छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या सातारा जिल्ह्यातील गड-कोटांना आता वेध लागलेत संवर्धनाचे. सर्वाधिक गड-कोटांचा जिल्हा असलेल्या सातारा टापूतील ऐतिहासिक भग्नावशेषांना प्रतीक्षा लागलीय झळाळीची. कारण, किल्ले संवर्धनासाठी राज्यांना विशेष अधिकार मिळाल्यामुळे संबंधित प्रकल्पाचा निर्णय दोन आठवड्यांच्या आत घेतला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गड-कोटांच्या सद्य:परिस्थितीचा घेतलेला आढावा...
‘वासोटा’ उरला साहसवीरांसाठी
सातारा : जावळी व कोयना खोऱ्यात सह्याद्रीच्या माथ्यावर विराजमान झालेला वासोटा किल्ला दुर्गयात्रींचा आवडता किल्ला. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला अन् साहसाची अनुभूती देणारा हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे. चारही बाजूला घनदाट अरण्य, कच्ची पायवाट, एकीकडे शिवसागर जलाशय, वन्यप्राण्यांचे वास्तव्य यामुळे हा किल्ला आजही विकासापासून बराच मागे राहिला आहे.
वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरुंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ‘वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाले असावे, असे म्हटले जाते. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा या किल्ल्याचे नाव ‘व्याघ्रगड’ असे ठेवले होते. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर ‘तुरुंग’ म्हणून केला जात असे.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे वासोटा दुर्गयात्रींचा आवडता किल्ला. मात्र, सेवा-सुविधांच्या अभावामुळे हा किल्ला आजही विकासापासून बराच मागे राहिला आहे. त्याला कारणेही तितकीच आहेत. अतीदुर्गम भागात वसलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. या ठिकाणी जंगली श्वापदांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. अनेक दुर्मीळ वनौषधी याच ठिकाणी आढळतात. त्यामुळे हा किल्ला वनविभागाच्या पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडतो. या कारणाने हा किल्ला विकासाच्या बाबतीत आजही मागे आहे. किल्ल्यावरील अनेक पुरातन वास्तूंचे अस्तित्व आज जरी जाणवत असले तरी या वास्तूंच्या संवर्धनासाठी व त्यांचे जतन करण्यासाठी ठोस उपाययोजनेची गरज आहे. जुना व नवीन असे दोन किल्ले साहसवीरांसाठीच महत्त्वाचे मानले जात आहेत. (प्रतिनिधी)
हजारो तोफांचे घाव सोसलेला अजिंक्यतारा आजही दुर्लक्षितच
सातारा : सातारा शहराची शान असणारा व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत विलोभनीय असा अजिंक्यतारा किल्ला सध्या दुर्लक्षाच्या भोवऱ्यात आहे. एकेकाळी तोफगोळ्यांचे घाव ज्या तटबंदींनी सोसले, त्या तटबंदी आजही दिमाखात उभ्या आहेत. शासनाने लक्ष घातल्यास हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
अजिंक्यतारा किल्ला हा शहरापासून ९०० फूट उंचीवर आहे. किल्ल्याची पूर्व-पश्चिम लांबी ३ हजार ३०० फूट तर दक्षिण-उत्तर लांबी १ हजार ८०० फूट आहे. हा किल्ला त्रिकोणी असून, याचा पाया दक्षिण-उत्तर पूर्वेस आहे. कोल्हापूरच्या शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने इ. स. ११९० मध्ये हा किल्ला बांधला. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला.
किल्ल्यावर सात तळी व विविध देवतांची मंदिरे आहेत. किल्ल्यावर पूर्वी शेती केली जात होती. आता ती होत नसली तरी पावसाळ्यात किल्ल्यावर मोठे गवत वाढते. किल्ल्याच्या माथ्यावर मोठी जागा असून, पाहण्यासारखे तर खूप काही आहे. मात्र, शासनाने या किल्ल्याकडे दुर्लक्ष केले असल्याने येथे पर्यटकांची संख्या रोडावली आहे.
अजिंक्यतारा किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम राज्याचा पुरातत्व विभाग हाती घेणार होते. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या ४ कोटी ५ लाखांपैकी १ कोटी रकमेच्या कामासाठी पुरातत्व विभागाने निविदा काढली होती. मात्र, वीस टक्के जादा दराने आलेली निविदा पुरातत्व विभागाने फेटाळली. किल्ल्याचे जीर्णोद्धार प्रकरण कंत्राटदार व पुरातत्व विभागात यांच्या दर कमी करण्याच्या वाटाघाटीत अडकले होते.
अजिंक्यतारा किल्ल्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे निधीच्या प्रतीक्षेत पडला आहे. मार्च २०१३ मध्ये या प्रस्तावाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. १० कोटी रुपयांच्या जागी आता १८ कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. या निधीपैकी साडेचार कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. १ कोटी निधीची तरतूद सांस्कृतिक व पुरातत्व विभागाने केली आहे.
किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम पुणे येथील पुरातत्व विभागाच्या कार्यालयाच्या माध्यमातून केले जाणार आहे. या कामाची निविदा प्रक्रियाही याच कार्यालयाच्या पातळीवर केली गेली आहे. पुरातत्व विभागाने या संदर्भात निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र, लालफितीच्या कारभारात अजिंक्यतारा किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे घोडे अडले आहे. या किल्ल्याच्या डागडुजीची मागणी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Waste awaiting light!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.