कोल्हापुरात एकाच रस्त्यावर दोन विभागाच्या निधीची उधळण, बांधकाम विभागाचा अट्टाहास
By भारत चव्हाण | Published: February 29, 2024 12:57 PM2024-02-29T12:57:30+5:302024-02-29T12:58:14+5:30
निधी अन्य कामांवर वळविण्यात काय अडचण?
भारत चव्हाण
कोल्हापूर : रस्ते करण्यास एकीकडे निधी मिळत नाही, अशी ओरड सुरू असताना दुसरीकडे मात्र शहरातील एकच रस्ता महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग असे दोघेही करणार आहेत. एकाच रस्त्यावर दोन विभागाचा निधी खर्च करणे याला शहाणपणा की मूर्खपणा म्हणावे, असा प्रश्न रस्त्याच्या परिसरातील नागरिकांना पडला आहे. महापालिका प्रशासनाने आम्ही हा रस्ता करणार असल्याचे सांगूनही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष करून तो आम्हीच करणार, असा हट्ट धरला आहे.
कोल्हापूर शहरातील संभाजीनगर कामगार चाळ ते निर्माण चौक, जरगनगर शेवटच्या बस स्टॉपपर्यंतचा रस्ता राज्य नगरोत्थानमधून मिळालेल्या १०० कोटींच्या निधीतून केला जाणार आहे. या रस्त्यासाठी चार कोटी ६७ लाख १७ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. महापालिकेच्या सूचनेप्रमाणे ठेकेदाराने या रस्त्यावरील सेवावाहिन्या स्थलांतराची कामे सुरू केली आहेत. पुढील चार-पाच महिन्यात रस्ता पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, निर्माण चौक ते जरगनगर शेवटच्या बस स्टॉप दरम्यानच्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दीड कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून त्यांनी नेमलेल्या ठेकेदाराची यंत्रणाही रस्त्याचे काम करण्यास तेथे पोहचली आहे.
रस्त्याचे काम, बाजूपट्ट्या करण्यास सुरुवात झाली आहे. एकाच रस्त्याचे काम दोन ठेकेदारांना कसे, असा काही नागरिकांना प्रश्न पडल्यानंतर त्यांनी महापालिका यंत्रणेशी संपर्क करून हा प्रकार शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या निदर्शनास आणून दिला. घाटगे यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागही करणार आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून संभाजीनगर कामगार चाळ ते जरगनगर शेवटचा बस स्टॉप हा रस्ता महापालिका शासन निधीतून करत असल्याचे सांगितले. मात्र त्या अधिकाऱ्यांनी आमचा निधी मंजूर झाला आहे, आता काम कसे थांबविणार, असा उलट प्रश्न केला. तेव्हा शहर हद्दीच्या बाहेरील रस्ता तुम्ही करावा, अशी सूचना घाटगे यांनी केली होती. पण तरीही त्यांचे न ऐकता काम सुरूच ठेवले आहे.
निधी अन्य कामांवर वळविण्यात काय अडचण?
महापालिका चार कोटी ६७ लाख रुपये खर्च करणार आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभाग दीड कोटी रुपये खर्च करणार आहे. याचा अर्थ महापालिका करणार असलेला रस्ता अधिक दर्जेदार व टिकाऊ असणार आहेे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपला निधी अन्य कामांवर वळविणे आवश्यक आहे. पण त्यांना सांगायचे कोणी, असा प्रश्न पालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.
नाहरकत कुठे आहे..?
शहर हद्दीत बांधकाम विभागाला एखादा रस्ता करायचा असेल तर त्यासाठी महापालिकेचा नाहरकत दाखला घ्यावा लागतो. त्यावेळी दोन विभागात कसा काय समन्वय झाला नाही, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.