सांडपाणी, कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान-उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 07:17 PM2018-12-17T19:17:18+5:302018-12-17T19:17:40+5:30
बदलत्या परिस्थितीत सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे. शासनाचे धोरण, उपलब्ध पर्याय, पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची भूमिका याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांच्याशी साधलेला ‘थेट संवाद’.
बदलत्या परिस्थितीत सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे. शासनाचे धोरण, उपलब्ध पर्याय, पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची भूमिका याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांच्याशी साधलेला ‘थेट संवाद’.
प्रश्न : शौचालय बांधणीमध्ये जिल्ह्याची स्थिती काय आहे?
उत्तर : काही वर्षांपूर्वी ज्या जिल्ह्यांमध्ये ९0 टक्क्यांहून अधिक ग्रामस्थांकडे शौचालये आहेत, अशा पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होता. मात्र, आता त्यामध्ये निकष बदलले आहेत. यामध्ये आता घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचाही समावेश करण्यात आला आहे. तरीही जिल्ह्यातील ५५५ गावांमध्ये ८६२३ शौचालये बांधण्याचे काम बाकी आहे; त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
प्रश्न : कचरा प्रक्रियेबाबत काय उपाययोजना सुरू आहेत?
उत्तर : काही छोटे प्रकल्प सुरू करून ते यशस्वी झाल्याशिवाय इतर गावांचा विश्वास बसत नाही; त्यामुळे आम्ही आठ गावांमध्ये ओला आणि सुक्या कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारत आहोत. त्यासाठी गेल्यावर्षी जिल्हा नियोजन समितीमधून ४0 लाखांचा निधी मिळाला आहे. नेसरी, मोरेवाडी, उचगाव, राधानगरी, अब्दुललाट, पुलाची शिरोली, कळे, बांबवडे येथे ही यंत्रणा देण्यात येणार आहे. १५ मिनिटांमध्ये ३0 किलो कचºयावर यामध्ये प्रक्रिया करण्यात येते.
प्रश्न : सांडपाणी व्यवस्थापनाचे काय काम सुरू आहे?
उत्तर : जिल्ह्यातील १४ गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी प्रकल्प उभारणीचे नियोजन आहे. यातील गारगोटी आणि जैनापूर येथे सांडपाणी स्थिरीकरण प्रकल्प घेण्यात आले आहेत. राजगोळी खुर्द, शिरगाव, यळगूड, माणगाव, बिद्री, फराकटेवाडी, नृसिंहवाडी, हालोंडी येथे हे प्रकल्प होणार आहेत. नाबार्डमधून शिरोली, कोडोली, कबनूर, रेंदाळ, अब्दुललाट, कोरोची, रुकडी, पट्टणकोडोली येथेही प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
प्रश्न : ‘वेंगुर्ला पॅटर्न’ काय आहे?
उत्तर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेने राबविलेल्या कचरा, सांडपाणी व्यवस्थापन उपाययोजनांची पाहणी केली आहे. त्यानुसार प्लास्टिक क्रशिंग मशीन्स बसविणे, पॅलेरायझिंग मशीन खरेदी, बायोगॅस युनिट आणि करवंटी, पाला- पाचोळ्यापासून छोट्या ब्रिक्स तयार करण्याची यंत्रणा घेण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. प्लास्टिकचा भुगा करून त्याचा वापर डांबरी रस्ते तयार करताना केला जाणार आहे.
प्रश्न : पंचगंगा प्रदूषण कमी करण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत ?
उत्तर : पंचगंगा नदीकाठावरील गावांचे सांडपाणी नदीत आहे त्या स्थितीत मिसळू नये, यासाठी उपाययोजना सुरू आहेत. नाबार्डमधून यासाठी योजना हाती घेण्यात आल्या आहेत. तसेच २५ लाख रुपये खर्च करून सहा गावांमध्ये सांडपाणी वाहून नेणाºया ओढ्यांवर बंधारे घालण्यात येणार आहेत. यासाठी ‘निरी’संस्थेचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
प्रश्न : जिल्ह्यातील स्वच्छताविषयक काय काम सुरू
आहे ?
उत्तर : मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या संकल्पनेतून आम्ही गावोगावी श्रमदानाचा उपक्रम सुरू केला आहे; त्यामुळे गावागावांमध्ये जागृती होत आहे. यासाठी आम्ही स्वच्छता आराखडे तयार करणार आहोत. ‘शाश्वत स्वच्छता’ केंद्रस्थानी मानून गगनबावडा तालुक्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. असाच आराखडा उर्वरित ११ तालुक्यांचा करण्यात येईल. यामध्ये शौचालय उपलब्धता, घरातील सांडपाणी आणि कचºयाचे घरातच व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी स्वच्छतेत सातत्य, मासिक पाळी व्यवस्थापन हे घटक यामध्ये महत्त्वाचे आहेत.
प्रश्न : पाण्याचे नमुने कधी तपासले जातात?
उत्तर : गेल्या दोन वर्षांपूर्वीपर्यंत पाण्याचे नमुने तपासण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जात होते. आता ते पाणी व स्वच्छता त्या विभागाकडून केली जाते. शासनाने जे वेळापत्रक ठरवून दिले आहे त्यानुसार गावोगावच्या पाण्याचे नमुने घेण्यात येत असून सोळांकूर, कोडोली, कोल्हापूर, गडहिंग्लज, शिरोळ येथे असलेल्या प्रयोगशाळांमध्ये या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येते.
प्रश्न : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाबाबत काय सांगाल?
उत्तर : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या निकषांमध्ये आता बदल करण्यात आला असून, आता जिल्हा परिषदेच्या प्रभागातून एक गाव निवडण्यात येणार असून, या गावाला १0 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यातील गावस्तरीय तपासणी सुरू आहे. यानंतर तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्याला तीन क्रमांक काढले जाणार आहेत.
- समीर देशपांडे