दानोळीत वारणेचे पाणी पेटले-गावात प्रचंड तणाव : इचलकरंजीला पाणी न देण्यावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:20 AM2018-05-03T01:20:35+5:302018-05-03T01:20:35+5:30

वारणा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देणार नाही, या वारणाकाठावरील ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे दानोळी (ता. शिरोळ) येथे वारणा बचाव कृती समिती, ग्रामस्थ व पोलीस प्रशासन बुधवारी

Wasting of Vanuat-Jalna Dam: Great tension in the village: Ichalkaranji strongly refuses to give water | दानोळीत वारणेचे पाणी पेटले-गावात प्रचंड तणाव : इचलकरंजीला पाणी न देण्यावर ठाम

दानोळीत वारणेचे पाणी पेटले-गावात प्रचंड तणाव : इचलकरंजीला पाणी न देण्यावर ठाम

Next
ठळक मुद्देअमृत योजनेचा प्रारंभ हाणून पाडला

वारणा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देणार नाही, या वारणाकाठावरील ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे दानोळी (ता. शिरोळ) येथे वारणा बचाव कृती समिती, ग्रामस्थ व पोलीस प्रशासन बुधवारी आमने-सामने आले. त्यामुळे दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. ग्रामस्थांचा विरोध आणि आक्रमकता पाहून पोलीस व प्रशासनाला माघारी फिरावे लागले. पाणीप्रश्नासाठी दानोळीकरांनी एकीचे दर्शन घडविले.

जयसिंगपूर / दानोळी / उदगाव : बुधवारी पोलीस बंदोबस्तात दानोळी येथे इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या जॅकवेल बांधकामाचा प्रारंभ केला जाणार होता. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी सकाळी आठपासून ग्रामस्थ शिवाजी चौकात थांबले होते. दुपारी एकच्या सुमारास मोठा पोलीस फौजफाटा, नगरपालिका व प्रशासकीय यंत्रणा गावात दाखल झाली. कोणत्याही परिस्थितीत योजनेचे काम सुरू करू देणार नाही. आमच्या रक्ताचेच पाणी इचलकरंजीकरांना प्यावे लागेल, असा आक्रमक पवित्रा घेत यंत्रणेला रोखण्यात आले. हात जोडून ग्रामस्थांनी प्रशासनाला विनंती केली.
यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यावेळी कृती समितीच्या पदाधिकाºयांसमवेत प्रांताधिकारी व पोलीस अधिकाºयांनी बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर केवळ जागेची पाहणी करणार आहे, असे सांगून वारणा बचाव कृती समितीच्या पदाधिकाºयांना सोबत घेऊन जात असतानाच ग्रामस्थांनी त्यालाही तीव्र विरोध केला. अखेर पोलीस फौजफाट्यांसह प्रशासन यंत्रणेला माघारी फिरावे लागले.
इचलकरंजी शहरासाठी दानोळी येथील वारणा नदीतून सुमारे ७० कोटी रुपयांची अमृत पेयजल योजना मंजूर झाली आहे. याची निविदाही मंजूर झाली आहे. याला दानोळी ग्रामस्थांचा विरोध आहे. दरम्यान, बुधवारी अमृत योजनेचे उद्घाटन करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात प्रशासकीय यंत्रणा येणार, अशी माहिती मिळाल्याने सकाळी आठ वाजल्यापासून ग्रामस्थ मोठ्या संख्येने शिवाजी चौकात एकत्रित येत होते. वेळोवेळी भोंगा वाजवून ग्रामस्थांना इशारा दिला जात होता. दुपारी एकच्या सुमारास प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार गजानन गुरव, मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, कृष्णात पिंगळे, सपोनि दत्तात्रय कदम, समीर गायकवाड यांच्यासह प्रशासन यंत्रणा व मोठा पोलीस फौजफाटा गावात दाखल झाला. यावेळी शिवाजी चौकाजवळच त्यांना ग्रामस्थांनी रोखले. यावेळी ‘पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर वारणा बचाव समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, ज्या धरणग्रस्तांना वारणाकाठच्या माळावर जमिनी दिल्या त्यांना अद्याप पाणी दिले नाही. अशातच इचलकरंजीसारख्या मोठ्या शहराला पाणी मागण्याचा कोणताही हक्क नाही. पोलीस बळाचा वापर करुन आमच्यावर दबाव टाकल्यास यापुढे रामायण-महाभारत घडेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी सरपंच सुजाता शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष सतीश मलमे, मानाजी भोसले, राम शिंदे, रावसाहेब भिलवडे, केशव राऊत, बापूसो दळवी, सुकुमार सकाप्पा, पोपट भोकरे, सुनील शिंदे, गुंडू दळवी, प्रमोद पाटील, धन्यकुमार भोसले, बबलू गावडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णवाहिका, पोलीस वाहने
दानोळी येथे सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण व कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे चारशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा, एक अप्पर पोलीस अधीक्षक, अठरा पोलीस निरीक्षक, २५ सपोनि व पोलीस उपनिरीक्षक असा बंदोबस्त होता.

ही अमृत नव्हे, विष योजना
दानोळी : पिण्याच्या नावाखाली वारणेचे पाणी नेणार आणि ते उद्योगाला वापरणार व त्यानंतर ते पाणी विष करून पंचगंगेत सोडणार आणि या योजनेला अमृत योजना कसं म्हणता? कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला वारणेचे पाणी देणार नाही, असे जाहीर प्रतिपादन शेतकºयांचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले. दानोळी येथे इचलकरंजीला जाणाºया अमृत योजनेविरोधात घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
एवढे पोलीस पाठवायला दानोळी काय सीमाभागातील गाव आहे काय? आज केलेला प्रकार म्हणजे हिडीस प्रदर्शनाचा प्रकार असून आम्ही त्याचा निषेध करतो. पुन्हा असा काही प्रकार होऊ नये आणि आमच्याशी ईर्षा कराल तर आम्ही आव्हान स्वीकारले म्हणून समजावे. जुनी योजना कालबाह्य झाल्याचे सांगून ढपला पडण्याचा प्रयत्न करत आहात. ती गळती नसून तुम्हाला पाण्याचा योग्य वापर करता आला नाही. तुमची मागणी योग्य असती तर आज तुम्हाला पोलीस लागले नसते, असे अनेक खडे बोल त्यांनी सुनावले.
वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, मुळात चांदोली धरण ३४ टी एम सी इतक्या कमी क्षमतेचे आहे. या धरणासाठी ज्यांनी जमिनी दिल्या, त्यांना वारणा काठावरील गावांनी राहण्यासाठी जागा व पिकवण्यासाठी शेती दिली, पण उलट इचलकरंजीने आपली जमीन जाते या हेतूने कालवा नको आणि वारणेचे पाणीही नको असा ठराव करून सुद्धा आता हे कोणत्या हक्काने पाणी मागत आहे.
आमदार उल्हास पाटील म्हणाले मी सुद्धा एक शेतकरी आहे. आज प्रशासनाने दानोळीवर केलेल्या प्रकाराचा शेतकरी या नात्याने निषेध करून घडला प्रकार विधानसभेत प्रशासनाला विचारणार आहे. शिरोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सर्जेराव शिंदे म्हणाले, आज दानोळीत घडलेला प्रकार पुन्हाही घडू शकतो, अशावेळी वारणा काठावरील सर्व शेतकºयांनी येऊन प्रशासनाला धडा शिकवा.
या सभेस आमदार उल्हास पाटील, बाबासाहेब भुयेकर, राजेंद्र पाटील-यड्रावकार, गणपतराव पाटील, विक्रांत पाटील, सावकार मदनाईक, सरपंच सुजाता शिंदे, महादेव धनवडे, रावसाहेब भिलवडे, सुरेश कांबळे, सतीश मलमे, सभापती मीनाक्षी कुरडे, पोपट भोकरे, समीर पाटील यांच्यासह वारणा काठावरील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. आभार गुंडू दळवी यांनी मानले. दरम्यान, अप्पर जिल्हा पोलीसप्रमुख श्रीनिवास घाडगे, मुख्याधिकारी प्रशांत रसाळ तहसीलदार गजानन गुरव, डी वाय एस पी कृष्णात पिंगळे यांनी प्रा. एन डी पाटील यांची भेट घेतली.


कोथळी, कवठेसार, चिपरी, कुंभोज आज बंद
वारणेचे पाणी देणार नाही, याला पाठिंबा देण्यासाठी वारणा काठावरील कोथळी ग्रामस्थांनी आज, गुरुवारी कोथळी बंद ठेवून शासनाचा निषेध नोंदविणार आहेत. यावेळी गावातून रॅली काढून जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय कवठेसार, चिपरी, उमळवाड, कुंभोज ही गावे आज बंद राहणार आहेत.

पंचगंगा प्रदूषणमुक्त करूया
४० कोटींची योजना ७० कोटींवर गेली. त्यामुळे वाढलेले बजेट कुठे जाणार असा सवाल करीत महादेव धनवडे म्हणाले, ज्या जॅकवेलचे काम केले जाणार आहे, ती जागा प्रशासनाला माहिती नाही. पंचगंगा उशाला, कोरड घशाला अशी अवस्था इचलकरंजीकरांची झाली आहे. यामुळे या योजनेपेक्षा याच निधीतून पंचगंगा प्रदूषणमुक्तकरूया.

...जागाच निश्चित नाही
इचलकरंजीची अमृत योजना दानोळी येथील वारणा नदीवरून राबविली जाणार असली तरी ज्या ठिकाणी जॅकवेल बांधण्यात येणार आहे, ती जागा नेमकी कुठे आहे, याचीही माहिती प्रशासनाला नसतानाही जॅकवेल बांधकामाचा प्रारंभ करण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा घेऊन प्रशासन कसे आले होते, शिवाय जागेची मोजणी झाली नसतानाही उद्घाटन असा उलगडा यानिमित्ताने चर्चेत आला.

मजलेवाडीतून पाणी उपशावरच एन. डी. ठाम
कोल्हापूर : मजलेवाडीची जुनी पाणी योजना दुरुस्त करून कार्यरत करण्यात काय हरकत आहे? इचलकरंजीसाठी एक टीएमसी पाणी वाट्याला येते, पण नगरपालिकेने शासनाला दिलेल्या माहितीनुसार सन २०१९ पासून २ टीएमसी पाणी उपसा करणार आहात. त्यामुळे दानोळीपासून वरील सर्वच बंधारे कोरडे पडणार असल्याने दानोळी उपसा योजनेची पहिल्यांदा श्वेतपत्रिका काढा, मगच त्यावर चर्चा करू, अशी भूमिका ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शिष्टमंडळासमोर स्पष्ट केली.
दानोळी (ता. शिरोळ) येथील इचलकरंजी नगरपालिकेची नवीन पाणी योजनेला स्थानिकांचा विरोध असून, याबाबत नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी प्रा. पाटील यांची कोल्हापुरातील निवासस्थानी भेट घेतली.
 

‘एन डी’ म्हणजे विजय
एन डी पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या चळवळी पूर्णपणे यशस्वी केल्या असून शेतकºयांना न्याय मिळवून दिला आहे. एन डी आज वारणा बचाव कृती समितीच्या सभेला आले म्हणजे विजय नक्कीच असे, अनेकांनी भाषणात बोलून दाखविले.
 

प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य तयारी केली होती. गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. त्यांच्याशी चर्चा झाली आणि चर्चा होऊन लोकभावनेचा आदर राखण्यासाठी प्रयत्न झाला. वरिष्ठ पातळीवर पुढचे निर्णय घेतले जाणार आहेत.
- समीर शिंगटे, प्रांताधिकारी

Web Title: Wasting of Vanuat-Jalna Dam: Great tension in the village: Ichalkaranji strongly refuses to give water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.