अंबाबाई मंदिरावर ६० सीसीटीव्ही कॅमेरांचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:49 AM2019-09-24T11:49:15+5:302019-09-24T11:51:39+5:30
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन, देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षक, स्वयंसेवकासोबतच अत्याधुनिक ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर मंदिर परिसरावर असणार आहे. दरम्यान, सोमवारी मंदिर परिसरात अत्याधुनिक अग्निरोधक यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन, देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षक, स्वयंसेवकासोबतच अत्याधुनिक ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर मंदिर परिसरावर असणार आहे. दरम्यान, सोमवारी मंदिर परिसरात अत्याधुनिक अग्निरोधक यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
येत्या रविवारपासून (दि. २९) नवरात्रौत्सव सुरू होत आहे. यानिमित्त अंबाबाई मंदिरात उत्सवाची लगबग सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत, यंदाच्या वर्षी मंदिर सुरक्षेसाठी अधिक कुमक मागवावी लागणार आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून सोमवारी दुपारी मंदिर परिसरातील उद्यानात अग्निरोधक यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अचानक आग लागली, तर ती विझवायची कशी, हे यावेळी दाखविण्यात आले.
उत्सवकाळात मंदिर परिसरात चारही दरवाजाबाहेर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. पूर्व दरवाजाबाहेर दोन व अन्य तीन ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे पाच डीएफएमडी यंत्रणा म्हणजे मेटल डोअर डिटेक्टर असणार आहेत. गेटवरील प्रत्येक सुरक्षारक्षकाकडे हॅन्ड मेटल डिटेक्टर असणार आहेत.
बिनतारी संदेश यंत्रणेचे १५ संच कार्यान्वित असणार आहेत. याशिवाय शेतकरी संघ व राजवाडा पोलीस स्टेशन अशा दोन ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा कक्षाची उभारणी केली जाणार आहे. पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदिर परिसरात व मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष देवस्थान समिती कार्यालयात असणार आहे. येथे समितीचे कर्मचारी दर्शनरांगेसह परिसरावर बारकाईने लक्ष देणार आहेत.