१९ तास पोलिसांचा खडा पहारा......मतमोजणी शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:53 PM2019-05-24T13:53:54+5:302019-05-24T13:56:48+5:30
कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांची पंचवार्षिक निवडणूक मतमोजणी प्र्रक्रिया किरकोळ वादावादी वगळता शांततेत पार पडली. कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांची पंचवार्षिक निवडणूक मतमोजणी प्र्रक्रिया किरकोळ वादावादी वगळता शांततेत पार पडली. कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. विजयी उमेदवारांना शहरासह गावोगावी मिरवणुका काढण्यास बंदी घातल्याने वादावादी किंवा हाणामारीच्या घटना घडल्या नाहीत. पोलिसांनी सुमारे १९ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी रमणमळा व शिवाजी विद्यापीठ राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदाम परिसरात पार पडली. या परिसरासह चौका-चौकांत, उपनगरांत व संवेदनशील गावांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस रखरखत्या उन्हातही रस्त्यांवर उभे होते. शहरातील चौका-चौकांत आणि मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेट लावून सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
काही वाहनधारक या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांशी हुज्जत घालत होते. पोलीस त्यांना सहकार्य करा, आम्ही पण माणसे आहोत, असे समजावून सांगत होते. पहाटे पाचपासून ते मध्यरात्री बारापर्यंत पोलीस रस्त्यांवर होते. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, गडहिंग्लज विभागाचे श्रीनिवास घाटगे, करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, शाहूवाडीचे आर. आर. पाटील, गडहिंग्लजचे अरुण कदम, जयसिंगपूरचे किशोर काळे, इचलकरंजीचे गणेश बिरादार यांच्यासह निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक फौजदार, हवालदार, कॉन्स्टेबल, होमगार्ड सुमारे १९ तास जिल्ह्यातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते.
ताराबाई पार्क, कावळा नाका परिसरात बंदोबस्त
राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या पराभवाच्या दिशेने वाटचालीचे चित्र दिसताच आमदार सतेज पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा आणि कावळा नाका परिसरातील आलिशान हॉटेल परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. चारही उमेदवारांच्या घरांसमोरही बंदोबस्त ठेवला होता. या मार्गावरून दुचाकींवरून जाणाºया कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून होते.
नाश्ता, जेवण नाही
बंदोबस्तासाठी पोलीस पहाटे पाचपासून रस्त्यांवर उभे होते. त्यांना चहा, नाश्ता नव्हे, तर जेवणही मिळाले नाही. रखरखत्या उन्हात रस्त्यावर उभे राहून पोलीस बंदोबस्त करीत होते. खानविलकर पेट्रोल पंप येथे वाहनधारक महावीर कॉलेजकडे जाण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घालत होते. यावेळी एका वैतागलेल्या पोलिसाने त्यांना ‘साहेब, तुम्ही घरातून जेवण करून आलाय, आम्ही पहाटेपासून उपाशी उभे आहोत. माणुसकी म्हणून थोडेतरी सहकार्य करा’, अशी विनवणी केली. त्यानंतर वाहनधारक काही न बोलता माघारी फिरले.
रस्त्यांवर शुकशुकाट
मतमोजणी केंद्र परिसरातील सर्व मार्गांवर, चौकांत आणि गावा-गावांत पोलीस बंदोबस्त असल्याने कारवाईच्या भीतीने बहुतांशी कार्यकर्ते घराबाहेर पडलेच नाहीत. विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषी मिरवणुकाही काढल्या नाहीत. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पार पडेपर्यंत शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.