रूकडीतील रेल्वेफाटक बोगद्यात पुन्हा साठले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:16 AM2021-06-19T04:16:16+5:302021-06-19T04:16:16+5:30
रूकडी माणगाव : रूकडी येथे रेल्वेफाटक शेजारी बांधण्यात आलेल्या नवीन बोगद्यात बुधवारी पाणी साठल्याने वाहतूक ठप्प झाली. ...
रूकडी माणगाव : रूकडी येथे रेल्वेफाटक शेजारी बांधण्यात आलेल्या नवीन बोगद्यात बुधवारी पाणी साठल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे या बोगद्याच्या दुरुस्तीबाबत रेल्वे विभागाकडून उदासीनता दाखविली जात असल्याने खासदार धैर्यशील माने यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. खासदार माने यांनी रेल्वे अधिकारी व ठेकेदार यांच्याशी संपर्क साधून बोगद्यात साठलेले पाणी ताबोडतोब निचरा करण्याची सूचना केली.
संबंधित ठेकेदार व रेल्वे प्रशासनाने तत्काळ बोगद्यातील साठलेले पाणी काढून पावसाळा संपेपर्यंत बोगद्यातील पाणी उपसण्यासाठी इंजिनाची व्यवस्था केली. रूकडी येथील लोहमार्गामुळे गाव दोन भागांमध्ये विभागले आहे. गावातून ये-जा करण्यासाठी हा प्रमुख मार्ग असून बोगद्यात लाईट, दोन्ही बाजूला संरक्षक भिंती, सांडपाण्याची व्यवस्था न करता बोगदा मार्ग गडबडीत खुला केला आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे बोगद्यात पाणी साठल्याने वाहतूक ठप्प झाली. याच अनुषंगाने या बोगद्याची दुरुस्ती न झाल्यास २४ जून रोजी रेल्वे स्थानकसमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रा.प.सदस्य शीतल खोत व शमुवेल लोखंडे यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात येथील पाणी बाहेर काढत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.