पाणीवापर वाढेल तसे दरही वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:35+5:302021-03-25T04:24:35+5:30
कोल्हापूर : वीस हजार लिटरपर्यंत पाण्याचा वापर करणाऱ्या नळ कनेक्शनधारकांना वगळून त्यापुढे वापर करणाऱ्या घरगुती, बिगर घरगुती तसेच ...
कोल्हापूर : वीस हजार लिटरपर्यंत पाण्याचा वापर करणाऱ्या नळ कनेक्शनधारकांना वगळून त्यापुढे वापर करणाऱ्या घरगुती, बिगर घरगुती तसेच औद्योगिक नळ कनेक्शनधारकांना महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी दरवाढीचा झटका दिला. तब्बल आठ वर्षानी झालेल्या दरवाढीचे समर्थन करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तसेच आसपासच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत हे दर निम्मेच असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पाणीवापर वाढेल तसे त्याचे दर वाढतील हे सूत्र पकडून ही दरवाढ करण्यात आली आहे.
शहरातील साठ टक्के नळ कनेक्शनधारकांना पाणीपट्टी वाढीचा फटका बसणार असून चाळीस टक्के नळ कनेक्शनधारकांना कसलीही दरवाढ होणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पहिल्या वीस हजार लिटरपर्यंत पाणी वापरणाऱ्या चाळीस टक्के नळ कनेक्शनधारकांना जुन्याच म्हणजे नऊ रुपये ५० पैशाने आकारणी होणार आहे. परंतु २०,००१ ते ४०,००० लिटरपर्यंत पाणी वापरणाऱ्यांना प्रति हजारी १ रुपया १५ पैसे जादा मोजावे लागणार आहेत. तर ४० हजारांपेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्यांना प्रतिहजारी तीन रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच बिगर घरगुती कनेक्शनधारकांना
सहा रुपये, तर औद्योगिक नळ कनेक्शनधारकांना नऊ रुपये जादा मोजावे लागतील.
शहरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गळतीकडे दुर्लक्ष करून शहरातील साठ टक्के नळ कनेक्शनधारकांवर दरवाढ लादली आहे. पाणी गळती, पाणीचोरी यामुळे प्रत्येक वर्षी पाणीपुरवठा विभागाला ३१ कोटी ३५ लाखाची तूट येते. ती भरून काढण्यासाठी ही दरवाढ केली असून त्यातून वर्षाला सहा कोटी रुपयांनी उत्पन्न वाढेल, असे सांगण्यात आले. गेल्या आठ वर्षांत पाणीपट्टी दरवाढ करण्यात आलेली नव्हती. विद्युत बिल, देखभाल दुरुस्ती, रॉ वॉटर बिगरसंचन पाणीपट्टीतील वाढ, आस्थापना खर्च व इतर आनुषंगिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करावी लागली, असे प्रशासन सांगते.
तक्ता-
वापर प्रकार वापर मर्यादा प्रचलित दर नवीन दर
१.घरगुती - ० ते २० हजार लिटर : ९.५० रुपये ९.५० रुपये
२० ते ४० हजार लिटर : ११.५० रुपये १२.६५ रुपये
४० हजाराच्या वर लिटर : १५.०० रुपये १८.०० रुपये
२. बिगर घरगुती --- ४०.०० रुपये ४६.०० रुपये
३. औद्योगिक ---- ६५.०० रुपये ७४.७५ रुपये
कोट -
पाणीपट्टी दर वाढवून आम्हाला नागरिकांना त्रास द्यायचा नाही; परंतु पाण्याचा वापर योग्य व्हावा हा हेतू आहे. पालिकेचे पाण्याचे दर हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणापेक्षा पन्नास टक्के कमी आहेत.
डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक
-अन्य कोणतीही करवाढ नाही -
पाणीपट्टी वगळता घरफाळा, परवाना शुल्क, नगररचना, केएमटी, आरोग्य, इस्टेट, वाचनालय याकडील दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. अग्निशमन सेवा तसेच केशवराव भोसले नाट्यगृहात अंशत: दरवाढ केली आहे. नाट्यगृहासाठी काही प्रयोगासाठी १० टक्के सवलतही देण्यात आली आहे.