हलगर्जीपणामुळे नागरिकांना दूषित पाणी
By admin | Published: October 5, 2015 12:43 AM2015-10-05T00:43:31+5:302015-10-05T00:50:05+5:30
चंदगड पंचायत सभा : प्रशासनावर आरोप; वनविभाग धारेवर; हत्तींच्या बंदोबस्ताची मागणी
चंदगड : प्रशासनाच्या जबाबदारी झटकून टाकण्याच्या वृत्तीमुळे चंदगडसह तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून संबंधित विभागांनी समन्वयाने हा प्रश्न सोडवून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे खडेबोल रविवारी झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत संबंधित विभागांना सुनावण्यात आले. सभापती ज्योती पवार-पाटील अध्यक्षस्थानी होत्या.गटविकास अधिकारी एस. डी. डवरी यांनी स्वागत केले. विषयपत्रिकेनुसार विस्तार अधिकारी गजगेश्वर यांनी तालुका आरोग्य विभागाचा अहवाल सादर केला. यावेळी चंदगडसह तालुक्यातील अनेक गावांचे पाणी दूषित असताना केवळ कागदोपत्री शुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याचे दाखवले जाते, असा गंभीर आरोप सदस्य अनिल सुरूतकर व उपसभापती शांताराम पाटील यांनी करत संबंधित विभागाला धारेवर धरले. त्यावर गजगेश्वर यांनी शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी केवळ आरोग्य विभागाची नसून ग्रामपंचायत व नळपाणीपुरवठा विभागही त्यासाठी जबाबदार असल्याचे सांगितले. त्यावर पाणीपुरवठा व ग्रामपंचायत विभागाने एकमेकांकडे बोट दाखवून दूषित पाणीपुरवठा होण्यास आपला विभाग जबाबदार नसल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर संबंधित विभागांनी समन्वयाने हा प्रश्न हाताळून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे सुनावण्यात आले. वनविभागाचा अहवाल बावरा यांनी सादर केला. यावेळी पावसाअभावी शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच जांबरे-उमगाव परिसरात हत्तींकडून मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकांचे नुकसान केले जात आहे. वारंवार हत्तींच्या बंदोबस्ताची मागणी करून वनविभाग तसेच शासनाकडून ठोस उपाययोजना राबवली जात नाही. त्यामुळे लोकांच्या उद्रेकाची वाट शासन पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित करून कोणतीही कारणे न सांगता तातडीने हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शांताराम पाटील यांनी केली.
प्र. शाखा अभियंता ए. एस. सावळगी यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी तालुक्यातील सहा मंडळांत पडलेल्या पावसावरून तालुक्यात झालेल्या सरासरी पावसाची आकडेवारी सादर केली. त्यावर सुरूतकर यांनी आक्षेत घेत तालुक्यातील अनेक भागात पाऊसच झालेला नाही; परंतु सरासरी आकडेवारीवरून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे दिसते; परंतु हे चुकीचे आहे. शासनाला विभागवार आकडेवारी कळवावी आणि दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. ग्रामीण आरोग्य विभागाचा अहवाल डॉ. साने यांनी सादर केला. यावेळी शांताराम पाटील यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी कुत्र्यांकडून चावा घेण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, आरोग्य विभागाकडे त्यावर देण्यात येणारी ‘रेबीज’ लस उपलब्ध नसल्याने तसेच चंदगड तालुका जिल्ह्यापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे याची नोंद घेऊन कोणतीही कारणे न सांगता रेबीज लस तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करावी, अशी सूचना केली. एनआरएचएचचा काही निधीही लस खरेदीसाठी वापरावा, असे गटविकास अधिकारी डवरी यांनी सांगितले. सदस्या तुळसा तरवाळ यांनी ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तेथील कर्मचाऱ्यांकडून सौजन्याची वागणूक मिळत नसल्याचे सांगितले.
जांबरे धरणातील पाणी सोडू नये
यंदा सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती आहे. चंदगड तालुकाही त्याला अपवाद नाही. तालुक्यातील धरणातील पाणीसाठा पाहता मार्च-एप्रिलमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे ताम्रपर्णी नदीतील पाणीसाठा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या सहमतीने जांबरे धरणातील पाणी ताम्रपर्णी नदीत सोडावे. धरणाच्या दुरुस्तीचे काम पुढे करून धरणात साठवलेले पाणी आताच सोडू नये, अशी मागणी शांताराम पाटील यांनी केली.