पन्हाळगडावर पाणी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 11:45 PM2018-10-07T23:45:38+5:302018-10-07T23:45:42+5:30
पन्हाळा : पाणीउपसा करणाऱ्या विद्युत पंपात बिघाड झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून पन्हाळगडाला कमी दाबाने व दोन दिवसआडाने पाणीपुरवठा होत असल्याने पन्हाळगडावर पाणी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये जीवन प्राधिकरण व नगरपरिषदेच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे.
पन्हाळगडाला १९८० साली आसुर्ले येथून जीवन प्राधिकरणाच्या वतीने नळपाणी पुरवठा योजनेला सुरुवात करण्यात आली. मात्र, ही योजना कार्यान्वित झाल्यापासून ते आजपर्यंत या योजनेकडे जीवन प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याने ती मोडकळीस आली आहे. सध्या संपूर्ण पाईपलाईन जीर्ण झाली आहे. त्यामुळे यामध्ये वारंवार बिघाड होऊन पन्हाळगडाचा पाणीपुरवठा खंडित होत आहे.
आसुर्ले येथून पाणी दरेवाडी, पाटाचीवाडी, रेडेघाट असे टप्प्या-टप्प्याने आणून पन्हाळ्याला पाणी सोडण्यात येते. मात्र, पाटाचीवाडी येथील पाणीउपसा करणाºया विद्युत पंपात बिघाड झाल्याने पन्हाळ्यातील रेडेघाट येथे पाणीसाठाच कमी होत असल्याने पन्हाळगडाला सध्या पाणी येण्याचे वेळापत्रक कोलमडले असून, कधी दोन दिवसआडाने, कधी तीन दिवसआडाने, तर कधी सकाळी, कधी दुपारी, कधी रात्री कमी दाबाने अल्पप्रमाणात पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे. त्यातच या पाणी संकट काळात नगरपरिषदेकडून टँकरने अथवा इतर पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र, नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पन्हाळ्यासाठी उत्रे येथील साडेपाच कोटी रुपयांची नवीन नळपाणी योजना लवकरात लवकर सुरू करावी, तसेच जीवन प्राधिकरण व नगरपरिषदेने या जुन्या योजनेत झालेला बिघाड दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.