‘धोम-बलकवडी’चे पाणी पोहोचले गिरवीत !
By admin | Published: April 19, 2015 11:41 PM2015-04-19T23:41:08+5:302015-04-20T00:23:32+5:30
अखेर स्वप्नपूर्ती : रखरखीत माळ भिजल्याने फलटण तालुक्याच्या पूर्व भागात जल्लोष
वाठार निंबाळकर : फलटण तालुक्याच्या दुष्काळी पूर्व भागाला ‘धोम-बलकवडी’चे पाणी मिळावे हे माजी आमदार चिमणराव कदम यांचे स्वप्न आणि ‘चिमणरावांच्या डाळिंबाच्या बागेला मीच पाणी देणार,’ हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांचे शब्द रविवारी सत्यात उतरले. कोरड्या रखरखीत माळावर कालव्यातून पाणी खेळले आणि गिरवीकरांनी जल्लोष केला.गिरवी (ता. फलटण) हे माजी आमदार चिमणराव कदम यांचे गाव. त्यांनी या कायम दुष्काळी भागाला हक्काचे पाणी मिळावे म्हणून त्याकाळी वारंवार जिकिरीचे प्रयत्न केले. १९९५ मध्ये रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हाच दुष्काळी भागाच्या पाण्याचा मुद्दा घेऊन विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविली. त्यात त्यांना घवघवीत यश मिळाले. ‘चिमणराव कदम यांच्या डाळिंबाच्या बागेला मीच पाणी देणार,’ असा शब्द निवडणूक प्रचारात रामराजे वारंवार
देत असत.
१९९५ मध्ये तत्कालीन युती सरकारच्या स्थापनेसाठी आमदारांची गरज होती. ती पूर्ण करण्याच्या बदल्यात धोम-बलकवडी व नीरा-देवघर धरणे पूर्ण करण्याची अट रामराजेंनी ठेवली. हे पाणी आदर्कीपर्यंत आले. या ठिकाणी माजी आमदार चिमणराव कदम, शंकरराव जगताप व माजी आमदार कृष्णचंद्र भोईटे यांच्या हस्ते जलपूजन करून रामराजेंनी वेगळेपण दाखविले. बिबी आणि वाघोशी येथे जलपूजन झाल्यानंतर पुढे बाणगंगा नदीत पाणी सोडून पुन्हा जलपूजन झाले. अशा रीतीने तालुक्यात पाच वेळा जलपूजन झाले. मात्र, गिरवी येथे पाणी येण्यास विलंब लागला.रविवारी पाणी गिरवी गावच्या परिसरात पोहोचले आणि गिरवीकरांची प्रतीक्षा संपली. सध्या धोम-बलकवडी कालव्याच्या एकूण १४७ किलोमीटर अंतरापैकी फलटण तालुक्याच्या हद्दीतील १२२ किलोमीटरपर्यंतची कामे पूर्ण झाली असून, गिरवीकरांची पाण्याची गरज विचारात घेऊन उपलब्ध पाणी गिरवी नळपाणी पुरवठा योजनेच्या तलावात सोडण्यात आले आहे.गिरवीपर्यंत पाणी येण्यासाठी विलंब लागण्याचे कारण संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, शेतकऱ्यांच्या अडचणी येत होत्या; मात्र संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी या अडचणी सोडविण्यास मदत केली.
तुळजाभवानीला अभिषेक
गिरवीच्या शिवारात आलेले पाणी घेऊन गिरवीकर पहाटेच तुळजापूरला गेले. या पाण्याने त्यांनी भवानीमातेला अभिषेक केला. तथापि, गिरवीत पाणी आल्याचे पाहण्यास चिमणराव कदम हवे होते, अशी हळहळ व्यक्त करताना ग्रामस्थांचे डोळे ओलावले होते.