जिल्ह्यातील पिकांना मेमध्ये एकदाच पाणी!
By admin | Published: April 30, 2016 12:38 AM2016-04-30T00:38:40+5:302016-04-30T00:56:39+5:30
‘पाटबंधारे’चे नियोजन : उर्वरित साठा ३० जूनपर्यंत पिण्यासाठी राखीव
कोल्हापूर : उन्हाळी हंगामातील मे महिन्यातील सिंचनासाठी देण्यात येणारे एकच आवर्तन एक मेपासून दहा मेपर्यंत चालू करण्याचे आदेश सिंचन विभागामार्फत देण्यात आले आहेत. त्यामुळे एका बाजूला उन्हाचा लाही- लाही उडविणारा तडाखा व पिकांना मात्र महिन्यांत एकदाच पाणी, अशी स्थिती उद्भवणार आहे. त्याचा पिकांच्या वाढीवर व जगण्यावरही मोठा गंभीर परिणाम होणार आहे. आता दहा दिवसांची उपसा बंदी असतानाच पिके वाळू लागल्याची तक्रारी आहेत. त्यात आणखी भर पडणार आहे.
साधारणत: आताच्या नियोजनानुसार दहा ते जास्तीत जास्त पंधरा मेपर्यंतच पिकांना पाणी देता येईल. त्यानंतर पाणी देता येणार नाही. मे महिन्याच्या अखेरीस चांगला वळीव झाला, तर या निर्णयाचा फेरविचार होऊ शकेल. आता उपलब्ध पाणीसाठा आणि तीस जूनपर्यंतचे पिण्यासाठी लागणारे पाणी याचा विचार करून पाटबंधारे विभागाने हे नियोजन केले आहे. प्रशासनाला नेहमीच पिण्याच्या पाण्यास अधिक प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे असा निर्णय घेणे भाग पडले आहे.
गतवर्षीच्या पावसाळी हंगामात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे भोगावती व पंचगंगा खोऱ्यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या राधानगरी प्रकल्पात शंभर टक्के, तर दूधगंगा जलाशयात ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाळ्यातील अवषर्णामुळे रब्बी हंगामात सिंचनासाठी सरासरीपेक्षा जादा पाणी वापर होत असल्याचे निदशर्नास आल्यावर जानेवारी २०१६ पासून आठ दिवसांची उपसा बंदी लागू केली होती. लोकाग्रहास्तव ही उपसा बंदी मार्चअखेर प्रत्यक्षात पाच दिवस राबवावी लागली. एप्रिलमध्ये दहा दिवसांची उपसा बंदी लागू करण्यात आली होती. दि. १४ एप्रिलच्या पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन मे महिन्यात सिंचनासाठी एक आवर्तन देण्यात यावे व उर्वरित पाणी तीस जूनअखेर पिण्यासाठी पुरवावे, असे नियोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे उन्हाळी हंगामातील मे महिन्यातील सिंचनासाठी देण्यात येणारे एकच आवर्तन एक मेपासून दहा मेपर्यंत चालू करण्याचे आदेश सिंचन विभागामार्फत देण्यात आले आहेत. याची भोगावती व पंचगंगा खोऱ्यातील लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
आतापर्यंत आपण शेतीसाठी महिन्याला दोन आवर्तने देत होतो; परंतु यंदाच्या हंगामात हिवाळ््यापासूनच पाण्याचा उपसा आजपर्यंतच्या मागच्या काही वर्षांपेक्षा जास्त झाला आहे. कमी पावसामुळे तहानलेली जमीन हे त्याचे मुख्य कारण आहे. यापूर्वी एका आवर्तनावेळी जिल्ह्यास सरासरी १२०० ते १४०० दशलक्ष घनफूट पाणी लागत होते. ते आता दीड टीएमसीपेक्षा जास्त लागत आहे. याचा विचार करूनच उपसा बंदीचा निर्णय घेतला आहे.
- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर