‘जल, ऊर्जा लेखापरीक्षण’ अपूर्ण
By admin | Published: March 6, 2016 10:22 PM2016-03-06T22:22:05+5:302016-03-07T00:43:30+5:30
गडहिंग्लज पालिका सभा : ठेकेदारास शेवटची संधी
गडहिंग्लज : तीन वर्षे उलटूनही नळपाणी पुरवठा योजनेचे जल व ऊर्जा लेखापरीक्षण अद्याप पूर्ण न झाल्यामुळे या कामास मुदतवाढ देण्यास तीव्र विरोध झाला. मात्र, तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला शेवटची संधी देण्यात आली.
नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्या अध्यक्षतेखाली गडहिंग्लज पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मटण मार्केटमधील खुल्या जागेतील चिकन विक्रेत्यांना मुदतवाढ आणि भाडेवाढ, घरकुल योजना, शौचालय अनुदान आणि नळपाणी पुरवठ्याच्या जल व ऊर्जा लेखापरीक्षणाबाबत विशेष चर्चा झाली.
रमाई व राजीव गांधी घरकुल योजनेंतर्गत अर्ज केलेल्या सर्व १२ लाभार्थ्यांना घरकुल बांधून द्यावे, अशी आग्रही मागणी सत्ताधारी व विरोधी दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी केली. करवसुलीच्या कामावर परिणाम होणार असल्यामुळे गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीसाठी पालिकेचे कर्मचारी घेऊ नयेत, अशी सूचना नरेंद्र भद्रापूर यांनी केली.
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तोट्या नसणाऱ्या नळांचे कनेक्शन तोडावेत, अशी मागणी किरण कदम व रामदास कुराडे यांनी केली. मात्र, संबंधितांना मुदतीची नोटीस देऊनच कारवाई करावी, अशी सूचना प्रा. स्वाती कोरींनी केली. चर्चेत उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, हारुण सय्यद, बसवराज खणगावे, दादू पाटील, बाळासाहेब वडर, लक्ष्मी घुगरे, अरुणा शिंदे, मंजुषा कदम यांनीही भाग घेतला. मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. (प्रतिनिधी)
नगरपालिकेचे नुकसान : संबंधितांवर कारवाईची मागणी
तीन वर्षांपूर्वी ठेका देऊनही जल व ऊर्जा लेखापरीक्षणाचे काम पूर्ण न झाल्याने नगरपालिकेचे नुकसान झाले आहे. त्याची संबंधित ठेकेदाराकडून भरपाई करून घ्यावी, अशी मागणी भद्रापूर यांनी केली.
अर्थसंकल्पात अपंग कल्याणासाठी ३ टक्के निधीची तरतूद आणि देवदासी छात्र वसतिगृहाचे थकीत भाडे दर्शविण्याची मागणी विरोधी नगरसेवकांनी लेखी पत्राद्वारे केली.
उचललेले शौचालय अनुदान दोन लाभार्थ्यांनी पुन्हा जमा केले आहे. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.