अपंग, निराधार महिलेच्या डोळ्यांत पाणी
By admin | Published: February 18, 2017 11:46 PM2017-02-18T23:46:23+5:302017-02-18T23:46:23+5:30
दारिद्र्यरेषेखालील कार्डापासून वंचित : अधिकारी मात्र निद्रिस्त; ६00 रुपयांत महिना काढताना नाकीनऊ
प्रदीप भोवड --- कणकवली --दु:ख कुणी किती सहन करावे यालाही काही मर्यादा आहेत. कुणाला त्रास द्यावा यालाही सीमा आहेत. जी महिला निराधार आहे, जिचे उत्पन्न महिना ६00 रुपये आहे, ती महिला दारिद्र्यरेषेखालील यादीत बसत नाही, असे ऐकल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे दारिद्र्यरेषेखालील यादीचे नियम तरी काय आहेत, असा प्रश्न पडतो. असलदे-नांदगाव येथील कुंदा रामचंद्र देवरुखकर या अपंग, निराधार महिला आपल्याला दारिद्र्यरेषेखालील रेशन कार्ड मिळावे यासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न करीत आहे; पण कणकवली तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधीला, समाजसेवकाला व अधिकाऱ्याला त्यांची दया आलेली नाही. दारिद्र्यरेषेखालील कार्ड नसल्यामुळे तिला अपंगांसाठी असलेला एस.टी.चा पास मिळत नाही. तिच्या घरात कमवता कोणीही नाही, तरी तिला दारिद्र्यरेषेखालील असलेले रेशनकार्ड मिळत नाही, त्यामुळे ती दारिद्र्यरेषेखालील धान्यापासून वंचित आहे. या अपंग महिलेने दारिद्र्यरेषेखालील कार्ड मिळावे यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, कणकवली तहसीलदार, कोळोशीचे तलाठी, मंडळ अधिकारी नांदगाव या सर्वांकडे अर्ज विनंत्या केल्या, पण एकाही अधिकाऱ्याला या अपंग महिलेची दया आली नाही. वार्षिक ७ हजार २00 रुपये उत्पन्न असल्याचे सर्व अधिकारी मान्य करीत आहेत, पण या महिलेला दारिद्र्यरेषेखालील कार्ड द्यायला कोणीही तयार नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. समाजातील लोकांच्या संवेदना किती बोथट झाल्यात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. एक अपंग महिला न्यायासाठी सरकारी अधिकाऱ्यांकडे खेपा घालते, पण तिला कोणीही आधार द्यायला तयार नाही. ती आजारी असताना उपजिल्हा रुग्णालयातही तिच्यावर मोफत औषधोपचार झालेले नाहीत. तिला औषधाची गरज असतानाही तिला उपजिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी असलेली कोणतीच सुविधा या निराधार अपंग महिलेला मिळू शकत नाही. या महिलेला ६00 रुपये संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन आहे. या महागाईच्या काळात ६00 रुपयांत महिना काढणे तिला कठीण झाले आहे. ही निराधार महिला या चिंतेनेच ग्रासली आहे.
आपल्याला दारिद्र्यरेषेखालील लोकांना मिळणारे धान्य मिळावे, मोफत एस. टी. सवलत मिळावी व औषधोपचार मिळावेत, अशी तिची अपेक्षा आहे. यासाठी आपल्याला दारिद्र्यरेषेखालील पिवळे कार्ड मिळावे एवढीच तिची अपेक्षा आहे.
ही माफक अपेक्षा कोणीतरी पूर्ण करावी, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.
आधार मागायचा कुणाकडे?
या अशिक्षित, निराधार, अपंग महिलेला समाजात कोणाचाच आधार राहिला नाही. लोकप्रतिनिधींना वेळ नाही, अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांचे काही देणे-घेणे नाही, मग या महिलेने आधार मागायचा कोणाकडे ? हा मोठा प्रश्न तिला भेडसावत आहे.