जयंती नाल्याचे पाणी झाले प्रवाहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 01:09 AM2019-05-13T01:09:48+5:302019-05-13T01:09:55+5:30
कोल्हापूर : जयंती नाल्यातील जलस्रोत सुरू करून पूर्ववत नदीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मनपाने रविवारी लोकसहभागातून दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता ...
कोल्हापूर : जयंती नाल्यातील जलस्रोत सुरू करून पूर्ववत नदीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मनपाने रविवारी लोकसहभागातून दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता मोहीम राबविली.
मोहिमेमध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था, महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक रहिवाशांनी मोठ्या हिरिरीने सहभाग घेतला. दुसºया टप्प्यातील मोहिमेतून नाल्यातील सुमारे १४ डंपर कचरा काढून तो उठाव केला. बचत गटांच्या महिलांनी ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’ असा नारा देत जनजागृती रॅली काढली. ध्यानचंद हॉकी स्टेडियम ते सिद्धार्थनगर या दरम्यान कोल्हापूर शहरातून जाणारा हा जयंती नाला स्वच्छ करून पाणी प्रवाहित केले.
महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नियोजित केल्याप्रमाणे शहरातून वाहणारा जयंती नाला लोकसहभागातून सफाईच्या मोहिमेला गेल्या रविवारी (दि. ५) प्रारंभ केला. त्यानंतर रविवारी दुसºया टप्प्यात नाला सफाईला प्रारंभ झाला. उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक राजाराम गायकवाड, संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, न्यायाधीश उपेशचंद्र मोरे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरुवात करण्यात आली. पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, दिलीप देसाई, फेरीवाला संघटनेचे दिलीप पोवार यांनी सक्रिय सहभाग नोदवला.
पंप हाऊस ते सिद्धार्थनगरपर्यंत, साईक्स एक्स्टेन्शनमधील जयप्रकाश नारायण उद्यान, यल्लमा मंदिरनजीक असे तीन ग्रुप करून ही स्वच्छता मोहीम राबविली. शहर पाणीपुरवठा व ड्रेनेज, बोअरिंग, बाग विभाग, आरोग्य विभाग, एन.यु.एल.एम., महिला बचत गट, स्थानिक नागरिक सहभागी झाले. सर्वांनी जयंती तसेच इतर नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, नागरिकांनी कचरा कोंडाळ्यातच किंवा घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे देऊन सहकार्य करावे. नागरिकांनी आपल्या घरातील कचºयाचे ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्ररीत्या गोळा करून महापालिकेच्या कर्मचाºयांकडे द्यावा, असे महापालिकेच्या वतीने आवाहन यावेळी करण्यात आले.
बचत गटांच्या रॅलीने उपक्रमाची सांगता
उपक्रमाची सांगता आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या उपस्थितीत बचत गटांच्या महिलांनी ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’अशा घोषणा देत रॅलीद्वारे केली. यावेळी महिलांनी जनजागृती मोहीम हाती घेतली. या बचत गटांमध्ये वारणानगर येथील वारणा प्रेरणा सी.एम.आर.के. गट, माळीम महिला विकास बचत गट, आसावरी महिला बचत गट, जिद्द वस्तीस्तर संस्था, प्रगती वस्तीस्तर संस्था, शाहूपुरी येथील स्वरा फौंडेशन यांचा सहभाग होता.
स्वयंसेवी संस्थांचा सहभाग
या नाला सफाई मोहिमेला लोकसहभागातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. यामध्ये फेरीवाला संघटना, क्रिडाई कोल्हापूर, आर्किटेक्ट असोसिएशन, हॉटेल मालक संघ, राजाराम गायकवाड विचारमंच यांच्यासह अनेक महिला बचत गटांचा सहभाग होता. महापालिकेच्या आरोग्य, बागा, पवडी, घरफाळा, अग्निशमन, पाणीपुरवठा, ड्रेनेज, प्रकल्प, वर्कशॉपमधील सुमारे १००० अधिकारी, कर्मचारी, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते, नागरिक यांनी सहभाग नोंदविला.