कोल्हापूर शहरात पाणी शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:27 AM2019-08-05T00:27:33+5:302019-08-05T00:27:37+5:30

धुवाधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या महापुराचा विळखा घट्ट होत असून पंचगंगेचे तसेच जयंती नदीचे पाणी शाहूपुरी कुंभार गल्ली, सुतारवाडा, सिद्धार्थनगर, ...

Water flows into Kolhapur city | कोल्हापूर शहरात पाणी शिरले

कोल्हापूर शहरात पाणी शिरले

googlenewsNext

धुवाधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या महापुराचा विळखा घट्ट होत असून पंचगंगेचे तसेच जयंती नदीचे पाणी शाहूपुरी कुंभार गल्ली, सुतारवाडा, सिद्धार्थनगर, शुक्रवार पेठ, मस्कुती तलाव, आदी भागांत घुसल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील १८७ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. रात्री राजाराम बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीची पाणीपातळी ही ४६ फूट इतकी होती. शहरात दोन ठिकाणी घरांच्या भिंती पडल्याच्या, तर झाडे पडल्याच्या अनेक घटना घडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सिद्धार्थनगर ते पंचगंगा स्मशानभूमी रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुराची पाणीपातळी झपाट्याने वाढू लागल्याने कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर वडणगे फाटा येथे रस्त्यावर पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आले; त्यामुळे नवीन शिवाजी पुलावरील वाहतूक चौकातच अडथळे उभारून रविवारी दुपारनंतर बंद करण्यात आली. तेथे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. त्यामुळे सकाळी विविध कामांनिमित्त आलेल्या नागरिकांची जाताना कुचंबणा झाली. त्यांना वाहने शिवाजी पुलावरच पार्किंग करून चालत आंबेवाडी, चिखली, आदी पुढील गावांत पाण्यातून जावे लागले. सायंकाळनंतर तर पुढे गावी जाणाºया नागरिकांना पायी सोडले जात होते; तर पूर पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही पुलावर जाण्यापासून पोलिसांनी रोखले.
नदीच्या पुराच्या पाण्यात वाढ होऊ लागल्याने पंचगंगा नदीमार्गावर पंचगंगा तालमीपर्यंत पाणी पोहोचले आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांचे पंचगंगा तालमीसह ग. गो. जाधव विद्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे.
जयंती नाल्याचे पाणी शाहूपुरीतील सुमारे १० घरांत घुसले, तर शाहूपुरी कुंभार गल्लीत जाणाºया मुख्य मार्गावर पाणी आले आहे. व्हीनस कॉर्नर चौकात पाणी आल्याने त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. व्हीनस कॉर्नर चौकानजीक असणाºया गाडीअड्ड्यात नाल्याचे पाणी शिरल्याने तेथे असणाºया अनेक स्क्रॅपच्या गाड्या तरंगू लागल्या. तसेच तेथील स्क्रॅप व्यावसायिकांच्या सुमारे २० हून अधिक केबिनमध्ये पाणी शिरले. त्यामुळे येथील साहित्य पाण्यावर तरंगत होते.
पावसाचे पाणी दगडमातीच्या भिंतींत मुरल्याने शहरात दोन ठिकाणी घराच्या भिंती पडण्याच्या घटना घडल्या. गुजरी रोडवर माने सराफ यांच्या घराची भिंत पडली; तर शिवाजी चौकानजीक चप्पल लाईनला गगन फुटवेअरच्या बंद असलेल्या दुकानाचे छत कोसळले. सुदैवाने गेली दोन वर्षे हे दुकान बंद स्थितीत असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
झाड पडल्याने तीन दुचाकींचा चक्काचूर
रविवारी सकाळी महावीर उद्यानानजीक रस्त्याकडेचे जुनाट झाड रस्त्यावर पडले. त्यामुळे रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या सुमारे तीन दुचाकी वाहने त्याखाली अडकल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले.
मस्कुती तलाव परिसरात शिरले पाणी
शुक्रवार पेठेत पंचगंगा नदीमार्गावर असणाºया सुमारे १० घरांत पाणी शिरले, तर मस्कुती तलावानजीक पंडित बोडके, विष्णू वीर, अमर कुंभार यांच्याही तळघरांत असणाºया चांदी कारखान्यांत पुराचे पाणी शिरल्याने कारखाने स्थलांतरित करावे लागले.
शाहू नाका, तावडे हॉटेल मार्गावरूनच शहरात प्रवेश
कोल्हापुरात जिल्ह्यात प्रवेश करणाºया बहुतांश सर्वच मार्गांना पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने ते बंद झाले आहेत. सध्या पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्गावरील शाहू टोल नाका व तावडे हॉटेल हे दोनच मार्ग शहरांत येण्यासाठी खुले आहेत. याच मार्गावरून शहरात येणारी वाहतूक सुरू आहे.

Web Title: Water flows into Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.