इचलकरंजीस वारणेतून पाणी

By Admin | Published: April 7, 2016 11:46 PM2016-04-07T23:46:15+5:302016-04-07T23:59:25+5:30

सुरेश हाळवणकर : दानोळी येथून ७१ कोटींच्या वारणा नळ योजनेस मान्यता

Water from Ichalkaranji wines | इचलकरंजीस वारणेतून पाणी

इचलकरंजीस वारणेतून पाणी

googlenewsNext

इचलकरंजी : दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीतून शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या ७१ कोटी रुपये खर्चाच्या नळ योजनेस शासनाने मान्यता दिली असून, हा प्रकल्प अमृत सिटी योजनेतून साकारला जाणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा या दोन्ही नद्यांतून पाण्याचा पुरवठा शाश्वत होत नसल्याने वारणा नदीतून पाणी आणणारी योजना नगरपालिकेने तातडीने मंजूर केली. केंद्र सरकारच्या अमृत योजनेमध्ये या योजनेचा समावेश होण्यासाठी अत्यंत कमी कालावधी असतानासुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारणा योजनेसाठी विशेष प्रयत्न केले आणि हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. दिल्ली येथे जाऊन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकया नायडू यांनाही शहरासाठी या पाणी योजनेची आवश्यकता असल्याचे समजावून सांगितले. मंत्री नायडू यांनीसुद्धा या योजनेचा प्रस्ताव तत्काळ अमृत योजनेमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले. यासाठी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, पाणी पुरवठा सभापती दिलीप झोळ आणि सर्वपक्षीय नगरसेवक यांचे सहकार्य मोलाचे ठरले. तसेच मुख्यमंत्र्यांबरोबर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही विशेष प्रयत्न या योजनेला लाभले.
यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष महावीर जैन, पाणी पुरवठा सभापती दिलीप झोळ, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, गटनेते महादेव गौड, नगरसेवक शशांक बावचकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

दररोज ८९ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा
वारणा नदीतून १९.५ किलोमीटर लांबीची दाबनलिका टाकण्यात येणार आहे. या नळ योजनेमध्ये इंटकवेल, जॅकवेल, वीजगृह, निरीक्षण विहीर, दोन नलिका, पंप हाऊस, ब्रेक प्रेशर टॅँक, अप्रोच ब्रिज अशा प्रकारची ७१ कोटी रुपयांची कामे समाविष्ट आहेत. साधारणपणे २०४९ मध्ये शहराची होणारी लोकसंख्या गृहीत धरून दररोज ८९ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करणारी योजना असेल, असेही आमदार हाळवणकर म्हणाले.

शिरोळचे पाणी पेटणार
दानोळीकरांची आज बैठक : इचलकरंजीस पाणी देण्यास तीव्र विरोध
दानोळी : येथील वारणा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देणार नाही, अशी ठाम भूमिका दानोळी गावाने घेतली आहे़ वारणा नदीतून अल्पसा होणारा पाणीपुरवठा, त्यात भीषण पाणीटंचाई याचे गणित लक्षात घेता भविष्यात दानोळीसह परिसरातील गावांना वारणा नदीतील पाणी महत्त्वाचे असल्याने दानोळीच्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे़ यासाठी आज, शुक्रवारी सकाळी गावचावडीत आंदोलनाची दिशा ठरणार आहे़
सध्याची दुष्काळ स्थिती पाहता पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ यातच इचलकरंजी नगरपालिकेने अमृत योजनेतून दानोळी येथील वारणा नदीतून पाणी उपसा करणार असल्याचे जाहीर केले आहे़ मात्र, दानोळी, कोथळी, उमळवाड, कवठेसार, कुंभोज, खोची, नरंदे, दुधगाव, कवठेपिरान, समडोळी, आदींसह परिसरातील गावांना वारणा नदीपात्रातून पाणी उपसा केला जातो़ मागील महिन्यात वारणेतील पाणी कमी झाल्यामुळे वारणा काठावरील गावांना सात-आठ दिवस पाणी मिळाले नव्हते़ शेतीसाठी पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी भांडण्याची वेळ येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत़
इचलकरंजी शहर तीन लाखांहून अधिक लोकसंख्येचे असल्यामुळे शहराला दररोज मोठ्या प्रमाणात पाणी उपसा लागणार आहे़ यातच वारणा नदी ही कृष्णेची उपनदी असल्याने या नदीचे पात्रही
छोटे आहे़
पावसाचेही प्रमाण कमी झाल्याने भविष्यात मोठी पाणीटंचाई निर्माण होणार असल्याची भीती शेतकऱ्यांना वाटत असून शेतीपिकांना पाणी मागण्याची वेळ येऊ नये, यासाठी दानोळीच्या नागरिकांनी यावर गांभीर्यपूर्वक विचार केला आहे़
इचलकरंजीला दानोळी येथील वारणा नदीतून पाणी उपसा करण्याचा ठराव मोडीत काढण्यासाठी दानोळी गावाने बैठक आज, शुक्रवारी गावचावडीत आयोजित केली आहे़

इचलकरंजीचे पाणी रोखणार
शिरोळकरांचा इशारा : पंचगंगेचे बंधारे अडविल्याने संताप
कुरुंदवाड : पंचगंगा नदी कोरडी पडल्याने शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीकाठच्या गावातील शेतीची पिके धोक्यात आली आहेत़ तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, अशा परिस्थितीत धरणांतून येणारे पाणी इचलकरंजी बंधाऱ्याद्वारे अडविल्याने व नगराध्यक्षासह नगरसेवकांनी बरगे काढण्यास पाटबंधारे अधिकाऱ्यांना अटकाव केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासो चौगुले यांनी बरगे न काढल्यास कुरुंदवाडमधील इचलकरंजीची कृष्णा नळ योजना फोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिरोळ व इचलकरंजीकर यांच्यात पाण्यावरून भडका उडण्याची शक्यता आहे़
पंचगंगा नदीवर शिरोळ तालुक्यातील २२ गावे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत़ इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिकीकरणाचे पाणी सोडले जात असल्याने प्रदूषित पाण्यामुळे मुळातच शिरोळ तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ शहरवासीयांचा हा अन्याय सहन करीत असतानाच पाण्याअभावी नदी कोरडी पडत असल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे़
शेतीबाबत पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून पाणी कपात योजना अवलंबली आहे़ मात्र, धरणातून येणारे पाणी इचलकरंजी नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यात बरगे घालून अडविले आहे़ त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ किमान पाणी मिळावे यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याचे बरगे काढण्यास गेले असता नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी विरोध केल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले़
धरणातून सोडण्यात येणारे पाणी अडविण्याचा पालिका पदाधिकाऱ्यांना अधिकार काय? असा सवाल अण्णासो चौगुले यांनी केला आहे़

Web Title: Water from Ichalkaranji wines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.