जिल्ह्यात १३० तलावांत सिंचन योजनांचे पाणी --: जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:57 AM2019-05-16T00:57:55+5:302019-05-16T00:59:01+5:30
जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करून जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन होत आहे. पाणी योजनांसाठी पाणी पुरवठा होत असलेले तलावही भरून घेण्याबाबत कार्यवाही होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी १५९ तलावांपैकी
सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करून जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन होत आहे. पाणी योजनांसाठी पाणी पुरवठा होत असलेले तलावही भरून घेण्याबाबत कार्यवाही होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी १५९ तलावांपैकी १३० तलाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यातून भरून घेतले आहेत. उर्वरित तलाव तातडीने भरून घ्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी सांगलीत दिले.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरआयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाई जाणवणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून, इतरही विभागांनी आपले नियोजन करून टंचाई निवारणास प्राधान्य द्यावे. सध्या जिल्ह्यातील पाणी योजनांचे आवर्तन सुरू असून त्या माध्यमातून जलस्रोत भरून घेण्यात यावेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १५९ तलाव भरून घेण्याची मागणी करण्यात आली होती. यापैकी १३० तलाव भरून घेण्यात आले आहेत. उर्वरित तलावही तातडीने भरून घ्यावेत.
यावेळी उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता एन. एस. करे, सूर्यकांत नलवडे, प्रशांत कडुसकर, व्ही. पी. पाटील, एस. के. पवार, डी. जे. सोनावणे उपस्थित होते.
पाणीसाठ्याचे नियोजन आवश्यक
जिल्हाधिकारी म्हणाले, कमी पाऊसमानामुळे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. जत तालुक्यातील १४, मिरज, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, तासगाव तालुक्यातील ६१, तर आटपाडीतील ११ जलसाठ्यांतील पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला आहे.