कासारी नदीचे पाणी दूषित, आरोग्याचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:24 AM2021-05-08T04:24:56+5:302021-05-08T04:24:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवलूज वार्ताहर - दिगवडे ते कसबा ठाणे (ता. पन्हाळा) दरम्यानच्या कासारी नदीतील पाणी दूषित झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवलूज वार्ताहर - दिगवडे ते कसबा ठाणे (ता. पन्हाळा) दरम्यानच्या कासारी नदीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता आहे. कासारी नदीवरील पुनाळ-तिरपण धरणापासून ते ठाणे-आळवे धरणापर्यंत कासारी नदीतील पाणी दूषित झाले असून पाण्यावर तेलकट रंगाचा काळपट तवंग दिसत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करण्याची परिसरातील लोकांची मागणी होत आहे.
पुनाळ-तिरपण धरणापासून ते ठाणे-आळवे धरणापर्यंतच्या कासारी नदी परिसरातील दिगवडे, पुशिरे, म्हाळुंगे, महाडिकवाडी, कसबा ठाणे, आळवे, कोतोली या गावांना नदीतून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. नदीतील दूषित पाण्यामुळे या गावांतील नागरिकांच्या व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊन त्याचा घातक परिणाम होत असल्याने यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.
सध्या सर्वत्र कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव, वातावरणातील रोजचा बदल अशा विविध कारणांमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत असताना अशातच नदीतील दूषित पाण्यामुळे परिसरातील लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजना करून दूषित पाण्याऐवजी शुद्ध पाणी मिळावे, अशी लोकांची मागणी आहे.
चौकट –
दूषित पाण्याबद्दल लोकांच्या तक्रारी आल्यानंतर पाण्याची टाकी दोनवेळा स्वच्छ करून घेतली. तरीदेखील काही फरक पडला नाही. त्यामुळे कासारी नदीवर जावून पाणी बघितले असता ते दूषित आढळून आले. त्यामुळे यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अनिष पाटील, सरपंच, कसबा ठाणे
फोटो ओळ –
कसबा ठाणे : येथील कासारी नदीमध्ये दिसत असलेले दूषित पाणी.