जिल्ह्यात खरिपांवर ‘पाणी’
By admin | Published: October 26, 2014 12:26 AM2014-10-26T00:26:06+5:302014-10-26T23:00:40+5:30
शेतकरी चिंताग्रस्त : पीक काढणी ठप्प; परतीचा मान्सून कोसळला
कोल्हापूर : जिल्ह्यात आज, शनिवारी दुपारी दीडपर्यंत परतीचा मान्सून कोसळत राहिला. यामुळे खरीप पिकांवर ‘पाणी’ पडले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. पीक काढणी ठप्प झाली. याउलट रब्बी पिकांच्या पेरणीला पाऊस उपयुक्त ठरला. रब्बी पेरणीला वेग आला आहे. ऊस पिकालाही हा पाऊस पोषक ठरला आहे.
यंदा जुलै महिन्यात दमदार पावसाला प्रारंभ झाला. तब्बल एक महिना उशिरा सर्वच पिकांची पेरणी झाली. परिणामी खरिपांची पिकेही एक महिना उशिरा म्हणजे आता परिपक्व झाली. सोयाबीन, ज्वारी, भात या पिकांच्या काढणीचा हंगाम वेगात सुरू आहे. पीक काढणी- पाठोपाठ मळणीही केली जात आहे. सोयाबीन व ज्वारीची मळणी यंत्रावर केली जात आहे. भात पिकाची मळणी डांबरी रस्त्यावर किंवा शेतातच ते बडवून काढले जात आहे.
दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र आकाशात ढग दाटून आल्याने पावसाळ्याप्रमाणे वातावरण झाले. रात्री आठनंतर संततधार पावसाला सुरुवात झाली. आज दुपारी दीडपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. कापणी करून मळणीसाठी ठेवलेले पीक पावसाने भिजले. पिकांचे ताडपत्रीच्या साहाय्याने झाकून पावसापासून संरक्षण करण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत; मात्र पाऊस जोराचा असल्यामुळे रचून ठेवलेले पीक भिजले. परिपक्व झालेले मात्र कापणी न झालेले भात पीक शेतातच जमीनदोस्त झाल्यामुळे नुकसान झाले आहे. जमिनीत ओल झाल्याने वापसा आल्यानंतर काढणीच्या कामाला पुन्हा प्रारंभ करावी लागणार आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर पावसाने उघडीप दिली.
जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यामुळे बळिराजाने रब्बी हंगामावर लक्ष केंद्रित केले आहे. रब्बी हरबरा, गहू, शाळू यांची पेरणी केली जात आहे. पेरणीला पाऊस अतिशय पोषक ठरला. याशिवाय गेल्या आठवड्यात पेरणी होऊन उगवून आलेल्या रब्बी पिकांच्या वाढीसाठीही पाऊस उपयुक्त आहे. दुसऱ्या बाजूला रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीचे काम ठप्प झाली. आॅक्टोबर हिट सुरू झाल्यामुळे ऊस पीक वाळत होते. यामुळे शेतकरी विहिरीतील उसाला पाणी देत होता. आता पावसामुळे एक पाण्याचा फेर देणे वाचणार आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी पावसामुळे खूश आहे. (प्रतिनिधी)