ग्रामस्थांच्या कष्टामुळे तलावाला फुटला पाझर!

By admin | Published: June 8, 2017 11:20 PM2017-06-08T23:20:48+5:302017-06-08T23:20:48+5:30

ग्रामस्थांच्या कष्टामुळे तलावाला फुटला पाझर!

The water of the lake is broken by the hard work of the villagers! | ग्रामस्थांच्या कष्टामुळे तलावाला फुटला पाझर!

ग्रामस्थांच्या कष्टामुळे तलावाला फुटला पाझर!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : मध्यभागी तलाव आणि चोहोबाजूला चार गावे. तलावाच्या काठीच या गावांच्या गावविहीरी. तलावात पाणी असेल तर विहीरीत पाणी. आणि विहीर भरलेली असेल तरच त्या गावांची तहान भागते; पण गेल्या तीन वर्षांपासून तलावातच ठणठणाट असल्याने चारही गावांना कोरड पडली. पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागले. त्यामुळे मुबलक पाण्यासाठी ग्रामस्थांनी कष्ट उपसले. आणि ग्रामस्थांचे कष्ट पाहून तलावालाही अक्षरश: पाझर फुटला.
कऱ्हाड तालुक्यातील मेरवेवाडी तलावावर अवलंबून असणाऱ्या मेरवेवाडी, पाचुंद, वाघेरी, कामथी गावावर टंचाईची भीषण परिस्थिती ओढवली होती. या चार गावांना वेगवेगळ्या चार गाव विहीरीतून पाणी पुरवठा होतो. संबंधित विहीरी एकाच ठिकाणी म्हणजे मेरवेवाडीतील तलावाच्या काठावर आहेत.
तीन डोंगरांच्या मध्यभागी असलेल्या या तलावात पाणी साचले की ते पाणी पाझराद्वारे संबंधित चारही गावांच्या विहीरीत जाते. तिथून पुढे ते पाणी गावात पिण्यासाठी पुरविले जाते. मात्र, गत तीन वर्षांपासून मेरवेवाडी तलावात नाममात्र पाणीसाठा होत होता. त्या पाण्यावरच चार गावांतील ग्रामस्थांना गुजराण करावी लागायची. गतवर्षी तर उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच या तलावात ठणठणाट झाला.
१९७२ च्या दुष्काळापेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण झाली. कामथीला पर्यायी पाण्याची व्यवस्था झाली. मात्र, मेरवेवाडी, पाचुंद व वाघेरी या गावांना पाण्याची पर्यायी व्यवस्थाच नसल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली.
मेरवेवाडी तलावाच्या खालील बाजूस मेरवेवाडीसह पाचुंद, वाघेरी व कामथी गावांच्या चार गावविहीरी आहेत. मात्र सलग तीन वर्षे अपेक्षित पाऊस झाला नसल्याने या चारही गावांच्या विहिरी गतवर्षी कोरड्या पडल्या.
दिवसभरात तासभर वीजपंप चालेल एवढेच पाणी फक्त मेरवेवाडीच्या एका गाव विहिरीत जात होते. अन्य तीन गावांच्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या. त्या विहिरींना मेरवेवाडी गाव विहिरीतून पाणी सोडण्यात येत होते. या परिस्थितीमुळे कोणत्याच गावाला पाणी पुरत नव्हते.
वाघेरी गावाने गतवर्षी तलावाच्या परिसरात बोअर मारली. मात्र बोअरला पाणी लागले नाही. त्यातच मेरवेवाडी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे टँकरची मागणी केली. मात्र, प्रशासनाने टँकर पुरविण्याऐवजी त्या टंचाई कामातून गावात बोअर मारली. दुर्दैवाने त्यालाही पाणी लागले नाही.
पाचुंदची गाव विहीर पूर्ण आटल्याने मेरवेवाडीच्या विहिरीतील अपुऱ्या पाण्यावरच त्यांना अनेक महिने तहान भागवावी लागली. कामथीची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच होती. ही चारही गावे अनेक महिन्यांपासून दुष्काळात होरपळत होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी अखेर लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थ एकवटले. दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायचे ठरले. त्यासाठी प्रशासनाला साकडे घालून लोकसहभागातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सलग काही दिवस
बंधाऱ्यातील गाळही काढण्यात आला. तसेच दुरूस्तीची कामेही करून घेण्यात आली. त्यानंतर पावसाळ्यात या तलावामध्ये चांगला पाणीसाठा झाला. परिणामी, तलावासह नजीकच्या चारही विहिरी भरून वाहू लागल्या. तलावातील गाळ काढल्याने यावर्षीच्या ऊन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागली नाही. मुबलक नसले तरी पुरेसे पाणी यावर्षात ग्रामस्थांना मिळाले. एकीच्या बळातून काय होऊ शकते?, याचे जीवंत उदाहरण या कामातून पाहायला मिळाले आहे.
पाचुंद गाव टंचाईत होरपळले
पाचुंद गाव गतर्षी दुष्काळात अक्षरश: होरपळून निघाले. मे महिन्यात गाव विहीर कोरडी ठणठणीत पडल्याने मेरवेवाडी जे काही पाणी देईल त्यावर पाचुंद ग्रामस्थांना तहान भागवावी लागत होती. जिथे पिण्याच्या पाण्याची मारामार तिथे जनावरांना पाणी कोठून आणणार, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला होता. मात्र, सध्या तलावात पाणीसाठा असल्याने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे.
चारा नसल्याने जनावरे विकली
वळीव पावसावर या परिसरातील डोंगरात भरपूर चारा पिकतो. मात्र, गतवर्षी वळीव पावसाने हुलकावणी दिली. विभागात एकही समाधानकारक वळीव पाऊस झाला नाही. परिणामी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला. त्यामुळे चारा नसल्याने काही शेतकऱ्यांना आपली जनावरेही विकावी लागली होती. गतवर्षीपेक्षा यावर्षीची स्थिती चांगली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तलावातील गाळ काढल्याने आणि दुरूस्तीची कामे झाल्याने तलावात अद्यापही पाणी शिल्लक आहे.
टेंभूतील पाणी तलावात सोडा
मेरवेवाडी तलावात यावर्षी पुरेसा पाणीसाठा झाला असला तरी मुबलक पाणीसाठा होऊन मेरवेवाडीसह वाघेरी, पाचुंद व कामथी या चारही गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकालात निघण्याची गरज आहे. त्यासाठी या तलावात टेंभू प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे, अशी चारही गावांतील ग्रामस्थांची व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावाही सध्या सुरू आहे.

Web Title: The water of the lake is broken by the hard work of the villagers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.