आधी पाणीगळती, चोरी रोखावी : कृती समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:13+5:302021-03-25T04:24:13+5:30
कोल्हापूर : शहरातील पाणी गळती तसेच पाण्याची होणारी चाेरी जरी रोखली तरी पाणीपट्टीत वाढ करण्याची आवश्यकता भासणार नाही हे ...
कोल्हापूर : शहरातील पाणी गळती तसेच पाण्याची होणारी चाेरी जरी रोखली तरी पाणीपट्टीत वाढ करण्याची आवश्यकता भासणार नाही हे सर्व पक्षीय कृती समितीने बुधवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना पटवून दिली. प्रशासनात असलेले मीटर रीडर याला प्रामुख्याने जबाबदार असल्याचे कृती समितीने निदर्शनास आणून दिले.
महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात कृती समितीचे निवास साळोखे, ॲड. बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, दुर्गेश लिंग्रज, अशोक भंडारे, किशोर घाडगे यांच्यासह अन्य काही सदस्यांनी बलकवडे यांची भेट घेऊन शहर पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराचा पर्दाफाश केला.
शहरात पन्नास टक्के गळती आहे. पाण्याची चोरी होत आहे. घरगुती वापर दाखवून अनेक हॉटेल व्यावसायिक तसेच रुग्णालये पाण्याचा वापर करत आहेत. काहीं व्यावसायिकांची मीटर कायम बंद आहेत. त्यामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. म्हणूनच प्रथम पाण्याची गळती तसेच चोरी रोखावी. जर त्याला यश आले तर होणारे नुकसान कमी होऊन तूट कमी होईल, याकडे कृती समितीने लक्ष वेधले.
अनेक वर्षे मीटर रीडर एकाच भागात काम करत आहेत. त्यांचे आणि काही ग्राहकांचे मिलीभगत झालेली आहे. त्यामुळे मीटर रीडरांच्या सतत बदल्या कराव्यात, अशी सूचनाही कृती समितीने केली. यावेळी गळती कशाप्रकारे दूर करता येईल, यावर विचार करून एक आराखडा तयार केला जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले.