पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा-पाऊस लांबल्यास कोल्हापुरात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:56 AM2019-05-31T00:56:38+5:302019-05-31T00:57:17+5:30

अवघा महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना कोल्हापूरकर पाण्याची बिनधास्त चैन करीत आहेत; पण ती चैन करण्याचे दिवसही आता संपण्याच्या मार्गावर आहेत. कारण, जिल्ह्याची तहान भागविणारी राधानगरी, काळम्मावाडी, वारणा, तुळशी ही चारही मोठी धरणे कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत

Water level in Kolhapur will be delayed by fifteen days | पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा-पाऊस लांबल्यास कोल्हापुरात पाणीबाणी

पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा-पाऊस लांबल्यास कोल्हापुरात पाणीबाणी

Next
ठळक मुद्देधरणांनी गाठला तळ : राधानगरीत एक, तर ‘काळम्मावाडी’त दीड टीएमसी पाणी;

कोल्हापूर : अवघा महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना कोल्हापूरकर पाण्याची बिनधास्त चैन करीत आहेत; पण ती चैन करण्याचे दिवसही आता संपण्याच्या मार्गावर आहेत. कारण, जिल्ह्याची तहान भागविणारी राधानगरी, काळम्मावाडी, वारणा, तुळशी ही चारही मोठी धरणे कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत. या धरणांतील सध्याचा पाणीसाठा केवळ १५ दिवस पुरेल इतकाच असून पाऊस लांबल्यास दुष्काळाच्या झळा या पाणीदार जिल्ह्यास बसणार आहेत.

सध्या राधानगरी धरणात एक टीएमसीपेक्षाही कमी पाणीसाठा आहे, तर काळम्मावाडी धरणात अवघे दीड टीएमसी पाणी शिल्लक आहे. वारणा ३.५, तर ‘तुळशी’ने ०.९० टीएमसी इतका आजवरचा नीचांकी साठा नोंदविला आहे. मान्सूनचे आगमन
२० दिवस लांबणीवर पडले आहे. सध्याचा पाणीसाठा केवळ १५ दिवस पुरेल इतकाच असल्याने आता फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून महाराष्ट्रात पाणीबाणी निर्माण होत असताना, धरणे कोरडी ठाक पडत असताना कोल्हापुरात मात्र मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही धरणांत मुबलक साठा दिसत असे; पण यावर्षी कडक उन्हाळा आणि वळीव पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढला शिवाय उन्हामुळे बाष्पीभवनात वाढ झाल्याचाही फटका पाणीसाठ्यावर झाला आहे. अवघ्या दहा दिवसांत या चारही प्रमुख धरणांतील साठा निम्म्याने कमी झाला आहे. गतवर्षीच्या आजच्या दिवशी या धरणांमधील साठा आजच्यापेक्षा चौपटीने जास्त होता. यावरून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात येते.

धरणांतील विसर्ग कमी
पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने त्याचा विसर्गावरही परिणाम झाला आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन नदीपात्रात पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागाने हात आखडता घेतला आहे. ‘राधानगरी’तून आजच्या घडीला केवळ ६१, तर ‘तुळशी’तून २२ घनफूट वगळता वारणा, काळम्मावाडी, कासारी, कडवी, कुंभीतून विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. २५ मे ते १० जून या कालावधीत केवळ ६२४ दशलक्ष घनफूट इतकेच कमी पाणी सोडण्यात येणार आहे.

लघुप्रकल्पही कोरडे
जिल्ह्यात पाटबंधारे विभागाच्या दक्षिण विभागांतर्गत ३१, तर उत्तर विभागांतर्गत ५४ लघुप्रकल्प येतात. मोठ्या धरणांतून ज्यांना पाणी मिळत नाही, त्यांना या लघुप्रकल्पांचा हातभार लागतो; पण हे प्रकल्पही कोरडे पडत आहेत. आज एकूण ८५ प्रकल्पांत केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी हेच प्रमाण २६ टक्क्यांच्याही पुढे होते.

खरीप पेरण्या लांबणीवर
वळवाने फिरविलेली पाठ, कोरडे तलाव, आटत चाललेल्या विहिरी आणि आता धरणांनीही तळ गाठल्याने सध्या शेतीसाठीच्या पाण्याची मोठी समस्या जिल्ह्यात निर्माण होत आहे. उसाचेच क्षेत्र जास्त असल्याने उपलब्ध पाण्यातून पीक वाचविण्याचे मोठे संकट आहे. मान्सून उशिरा येणार असल्याने आणि पाणीच उपलब्ध होणार नसल्याने खरीप पेरण्यांवर याचा परिणाम होणार आहे.


प्रमुख चार धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
धरण आजचा गतवर्षी याच दिवशीचा
राधानगरी ०.८६ २.२७
तुळशी ०.९० १.३२
वारणा ३.०५ ७.८१
काळम्मावाडी १.५७ ५.३६

Web Title: Water level in Kolhapur will be delayed by fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.