श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तीन फुटाने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 06:47 PM2020-08-18T18:47:44+5:302020-08-18T18:51:17+5:30
गेले दोन दिवस सागंली, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीचे वेगाने वाढणारी पाणी पातळी आज सकाळपासून मंदावली.
प्रशांत कोडणीकर
नृसिंहवाडी : गेले दोन दिवस सागंली, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीचे वेगाने वाढणारी पाणी पातळी आज सकाळपासून मंदावली.
पाउस थांबल्याने आणि धरणातून होणारा विसर्ग कमी झाल्याने व अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने येथील कृष्णा-पंचगंगा नदीची पाणी लवकरच स्थिर होईल. या आशेने नदीकाठच्या लोकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, कालपासून नदीच्या पाणी पातळीत तीन फुटाने वाढ झाली. नदीचे वाढलेले पाणी नृसिंहवाडी परीसरातील बाबर वसाहत, राम नगर, सुमित्रा मंगल कार्यालय, प्रबुद्ध नगर आदी ठिकाणी नदीचे पाणी पोहचल्याने त्या परिसरातील सुमारे २० कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.
दत्त मंदिर परिसरातील टेंबे स्वामी नवे मंदिर, गोपाळपुरा देणगी ऑफिस, प.पू.नारायणस्वामी मंदिर आदी ठिकाणी नदीचे पाणी पोहचले आहे.
श्री दत्त मंदिरात नदीचे पाणी असल्याने श्रींची उत्सवमूर्ती प.पू. नारायणस्वामी महाराजांच्या मठात ठेवण्यात आली असून तिथे तिन्ही त्रिकाळ पूजा अर्चा चालू आहे. दत्तात्रय, पांडुरंग व अवधूत रुक्केपुजारी व परिवार हे श्रींच्या उत्सवमूर्तीसाठी रोज लागणाऱ्या फुलांच्या माळेची सेवा करत असून संजय रुक्केपुजारी हे श्रींचा आकर्षक पोशाख करण्याची सेवा करत आहेत.