भोगावती नदीपात्रात पाणी सोडल्याने पाण्याचा प्रवाह वाढला, सोन्याची शिरोलीतील शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 11:42 AM2022-05-30T11:42:10+5:302022-05-30T12:33:53+5:30
अचानक राधानगरी धरणातून पाणी सोडल्याने पोहत असलेल्या या दोन्ही मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून जावू लागल्या. तनुजा ही पोहत कशीबशी नदीकाठाला आली. त्यानंतर तिला महिलांनी वोडून घेतले. पण सई पाण्यात बुडाली.
राधानगरी : भोगावती नदीपात्रात पाणी सोडल्याने पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदी पात्रात पोहायला गेलेल्या एका शाळकरी मुलीचा बुडून मुत्यू झाला. सई नामदेव चौगले (वय-१०, रा. सोन्याची शिरोली, ता. राधानगरी) असे मृत मुलीचे नाव आहे. दरम्यान, प्रसंगधानामुळे सुदैवाने सोबत असलेल्या दुसऱ्या मुलीचा जीव वाचला. काल, रविवारी ही दुर्घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, मृत सई चौगले ही इयत्ता तिसरीत शिकत होती. ती आणि तनुजा घरातील महिलांसोबत कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेल्या होत्या. गेले चार दिवस भोगावती नदी पात्रात पाण्याचा प्रवाह कमी होता. यामुळे नदीपात्रात कपडे धुणे तसेच सुट्टीचे दिवस चालू असल्याने पोहण्यासाठी लहान मुले येतात. मात्र काल, अचानक राधानगरी धरणातून पाणी सोडल्याने पोहत असलेल्या या दोन्ही मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून जावू लागल्या. तनुजा ही पोहत कशीबशी नदीकाठाला आली. त्यानंतर तिला महिलांनी वोडून घेतले. पण सई पाण्यात बुडाली.
यावेळी महिलांनी आरडा ओरडा केल्यानंतर काही लोकांनी सईला पाण्याबाहेर काढले पण ती बेशुद्ध पडली होती. तिला तात्काळ राधानगरी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले पण त्या आधीच तिचा मृत्यू झाला होता. या प्रसंगामुळे राधानगरी परिसरात हळहळ व्यक्त होत होती.