म्हैसाळ योजनेचे पाणी गेले आरगपर्यंत
By admin | Published: February 21, 2016 11:55 PM2016-02-21T23:55:59+5:302016-02-21T23:55:59+5:30
टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा : उद्या सलगरे, कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी पोहोचणार
मिरज : म्हैसाळ योजनेतून सोडण्यात आलेले पाणी आरग येथील चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. सोमवारी सलगरे येथे पाचव्या टप्प्यापर्यंत व तेथून कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी पोहोचणार आहे. पहिल्या टप्प्यातील सहा पंपांसह तीन टप्प्यातील १४ पंपांद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. म्हैसाळ योजनेतून पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे म्हैसाळ योजना शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता व पाणी टंचाईमुळे पिके धोक्यात आल्याने वसंतदादा, महांकाली, मोहनराव शिंदे या कारखान्यांनी तीन कोटी रूपये व शेतकऱ्यांनी ३० लाख रूपये जमा केल्यानंतर म्हैसाळ योजनेचे पंप सुरू झाले. या रकमेत एक महिना ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील सहा, दुसऱ्या टप्प्यातील ४, तिसऱ्या टप्प्यातील ४ पंप सुरू करण्यात आले आहेत. उद्यापासून सलगरे येथे पाणी पोहोचल्यानंतर पाचव्या टप्प्यातील पंप सुरू होणार आहेत. पाचव्या टप्प्यातील पंप सुरू होताच पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील आणखी पंप सुरू करून पाणी उपसा वाढविण्यात येणार आहे. म्हैसाळ योजनेसाठी पाणी उपसा करण्यासाठी नदीत चांदोली धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी कवठेमहांकाळपर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या टप्प्यातील १८ पंपांद्वारे प्रति सेकंद एक हजार क्युसेक्स पाण्याचा उपसा करावा लागणार असल्याचे म्हैसाळ प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी द्राक्षबागा इतर फळबागा व पानमळे उभे केले आहेत. थकित पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी सोडल्याने द्राक्ष व फळबागांचे नुकसान टळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
म्हैसाळ योजनेचे यापूर्वी आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान ५० दिवस आवर्तन सुरू होते. मात्र सध्याच्या उन्हाळ्यात एका महिन्याचे आवर्तन अपुरे असल्याने एप्रिलअखेर आवर्तन सुरू ठेवण्याची येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.