भादोलेमध्ये इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

By admin | Published: December 23, 2016 12:54 AM2016-12-23T00:54:17+5:302016-12-23T00:54:17+5:30

जनसुराज्य-काँग्रेस सामना रंगणार : पंचायत समितीच्या रूपाने इच्छुकांना दुधावरची तहान ताकावरच भागवावी लागणार

Water on the mind of the wishers in Bhadolas | भादोलेमध्ये इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

भादोलेमध्ये इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

Next

नाना जाधव --भादोले जिल्हा परिषद मतदारसंघ इतर मागासवर्ग जाती (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाल्याने इच्छुकांचे मनसुबे उधळले आहेत. तसेच भादोले पंचायत समिती अनुसूचित जमाती पुरुषासाठी राखीव झाला आहे. तर टोप पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण पुरुष राहिल्याने जिल्हा परिषदेच्या इच्छुकांना दुधावरची तहान ताकावरच भागवावी लागणार आहे. या मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे वर्चस्व असून, आगामी निवडणुकीत जनसुराज्य व काँग्रेस यांच्यामध्ये खरी लढत होणार आहे.
भादोले मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसची ताकद होती. २००७ च्या निवडणुकीत आमदार अमल महाडिक हे काँग्रेस पक्षातून विजयी झाले होते; परंतु जनसुराज्य पक्षाच्या एंट्रीने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला तडा गेला. २०१२ च्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षातून मंदाताई घाटगे या ४००० च्या मताधिक्याने निवडून आल्या. सध्याही काँग्रेस-जनसुराज्य पक्ष अशीच लढतीची शक्यता दिसून येते.
शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांचेही या निवडणुकीत उमेदवार असणार आहेत. जरी पंचरंगी लढतीचे चित्र दिसत असले, तरी अंबपचे बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच भाजपचे आमदार अमल महाडिक यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
नुकत्याच झालेल्या वडगाव नगरपालिका निवडणुकीत भाजप-जनसुराज्य अशी युती करण्यात आली होती. जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप-जनसुराज्य युती कायम राहिल्यास काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. सध्या तरी काँग्रेसमधून माजी जि. प. सदस्य रहिमान मुल्लानी यांच्या पत्नी मुमताज मुल्लानी यांचे नाव चर्चेत आहे. जनसुराज्य पक्षाकडून ग्रामपंचायत सदस्या शोभा कोळी, पुष्पांजली क्षीरसागर, निसार बेगम सनदे यांचे नाव चर्चेत आहे. भाजपकडून अन्वरबी जमादार यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेनेकडून माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण यांच्या पत्नी सुरेखा चव्हाण यांचेही नाव चर्चेत आहे. तर स्वाभिमानी पक्षाकडून शालन रामदास वड्ड यांचे नाव आघाडीवर आहे.
भादोले पंचायत समिती अनुसूचित जाती पुरुष राखीव असून, येथे जनसुराज्यकडून माजी जि. प. सदस्य दत्ताजी घाटगे यांचा मुलगा राज घाटगे, अनिल अवघडे इच्छुक आहेत. काँग्रेसकडून उमेश अवघडे इच्छुक आहेत. भाजपकडून सचिन कांबळे, सागर कांबळे, दीपक ढाले यांची नावे आघाडीवर आहेत. शिवसेनेकडून अनिल दबडे, तर आरपीआयकडून प्रकाश कांबळे इच्छुक आहेत.
टोप पंचायत समिती सर्वसाधारण असून, इच्छुकांची मांदियाळी पाहता यावेळी नेत्यांचा कस लागणार आहे. ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, माजी सभापती बाबासो पाटील, सेनेकडून सागर चोपडे, जनसुराज्य पक्षाकडून विकासराव माने यांची नावे आघाडीवर आहेत. जर विकासराव माने जनसुराज्य पक्षाकडून उभे राहिले, तर जि. प. मतदारसंघातील जनसुराज्यला लाभ मिळण्याची शक्यता आहे.


पक्षांची शक्तिस्थळे
जनसुराज्य : विजयसिंह माने, दत्ताजी घाटगे, रावसो पाटील, महेंद्र शिंदे
राष्ट्रीय काँग्रेस : धोंडिराम पाटील, रहिमान मुल्लाणी, जयवंतराव आवळे यांचे कार्यकर्ते
भाजप : पी. डी. पाटील, दीपक ढाले, अमल महाडिक, त्यांचे कार्यकर्ते
शिवसेना : आकाराम दबडे, चंद्रकांत जमादार, महेश चव्हाण, विठ्ठलपंत पाटील यांचे कार्यकर्ते

Web Title: Water on the mind of the wishers in Bhadolas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.