निपाणीला सोमवारपासून तीन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:24 AM2021-04-02T04:24:38+5:302021-04-02T04:24:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी ‌‌: निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावाची पातळी १ एप्रिल रोजी ३७ फूट ११ इंच ...

Water to Nipani for three days from Monday | निपाणीला सोमवारपासून तीन दिवसांआड पाणी

निपाणीला सोमवारपासून तीन दिवसांआड पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

निपाणी ‌‌: निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावाची पातळी १ एप्रिल रोजी ३७ फूट ११ इंच इतकी आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तलावातील पाण्याची पातळी ३९ फूट ३ इंच होती. सध्याच्या परिस्थितीची पाहणी करता, येत्या काळात निपाणी शहराला पाणीटंचाई होऊ नये यासाठी येत्या सोमवार (दि. ५) पासून निपाणी शहर व उपनगरांत तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी दिली. आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयुक्त महावीर बोरनवर, उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती सद्दाम नगारजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नगराध्यक्ष भाटले पुढे म्हणाले की, जवाहर तलावातून निपाणी शहराला पाणीपुरवठा होत असतो. प्रतिदिवसागणिक तलावातील पाण्याची पातळी एक इंच अशी कमी होत आहे. सोळा वर्षांनंतर प्रथमच फिल्टर बेड पूर्णपणे बदलण्यात आले असल्याने यापुढे गढूळ पाणीपुरवठा होणार नाही. शहरात होत असलेली गळती काढून सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. शनिवारपासून गळती काढण्यासाठी कामकाज सुरू होणार आहे. यमगर्णी येथून तलावात होणारा पाणीपुरवठा सध्या सुरू आहे; पण शिरगुपी जलाशयातून होणारा पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे जूनअखेर या पाण्याचा वापर होणे गरजेचे आहे. यामुळे तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन

जूनअखेर तलावातील पाणी नागरिकांना पुरविणे हे मुख्य काम आहे. पाणीटंचाई होऊ नये यासाठी नागरिकांनी पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या नळाला चाव्या बसवून घेणे व पाण्याचा वापर गरजेपुरता करणे आवश्यक आहे. गाड्या धुणे व इतर अनावश्यक कारणांसाठी पाणी वापरणे नागरिकांनी बंद करावे, असे आवाहन सर्व नगरसेवकांच्या वतीने नगराध्यक्षांनी केले.

३ कोटी २१ लाख वसुली

सन २०२०-२१ मध्ये मार्चअखेर नगरपालिकेने ३ कोटी २४ लाख रुपयांची वसुली पूर्ण केली आहे. एप्रिल २०२१ मध्ये या महिन्याचा फाळा भरणाऱ्या नागरिकांना पाच टक्के डिस्काउंट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये घरफाळा, दुकानफाळा, इंडस्ट्री फाळा, प्रॉपर्टी टॅक्स यांचा समावेश आहे. त्याचबरोबर फाळ्याच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नसून नागरिकांना त्रास होणार नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Water to Nipani for three days from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.