निपाणीला १५ जूनपासून दोन दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:42+5:302021-06-06T04:18:42+5:30
पुरवठा नगराध्यक्ष जयवंत भाटले : स्वच्छ पाणी पुरवठा करण्यास प्राधान्य लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : निपाणी शहरातील पाणीपुरवठा ...
पुरवठा
नगराध्यक्ष जयवंत भाटले
: स्वच्छ पाणी पुरवठा करण्यास प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : निपाणी शहरातील पाणीपुरवठा आता सुरळीत होणार असून येत्या १५ जूनपासून शहराला दोन दिवसाआड पाणी मिळणार आहे. पाणी पुरवठ्यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक दुरुस्त्या केल्या असून नागरिकांना स्वच्छ व वेळेत पाणी मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष अनिता बागडे, सभापती सद्दाम नगारजी, आयुक्त महावीर बोरनवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शनिवारी सकाळी महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका सभागृहात आढावा बैठक झाली. या बैठकीत मंत्री शशिकला जोल्ले यांनी जैन इरिगेशन व निपाणी शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. यानंतर नगराध्यक्ष भाटले यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती दिली.
ते म्हणाले की, जवाहर तलाव परिसरातील चार फिल्टर बेड स्वच्छ करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सुरूच असलेला गढूळ पाण्याचा पुरवठा बंद होऊन स्वच्छ पाणी मिळणार आहे. सोळा वर्षांनंतर प्रथमच फिल्टर बेड स्वच्छ करण्यात आला आहे. चार फिल्टर हाऊस, २० लाख लिटर पाण्याची टाकी, त्याचबरोबर भंगी कॉटर येथील टाकी यांची स्वच्छता करण्यात आली आहे. दहा वर्षांनंतर येथील गाळ काढण्यात आला असून यामुळे स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे. सध्या पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या रंगाच्या तक्रारी आहेत पण त्याही व्यवस्थित होणार आहेत.
पाणीपुरवठा सुरूच असताना काही प्रभागांमधील पाण्याचे नमुने घेतले असून पाणी स्वच्छ आढळून आले आहे. गेल्यावर्षी ५ जून रोजी जवाहर तलाव येथील पाण्याची पातळी ३४ फूट ९ इंच इतकी होती. ती यावर्षी पाण्याची पातळी ३६ फुटांवर आहे. यामुळे दोन दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.
निपाणी नगरपालिकेत सत्ता स्थापन झाल्यापासून १० कोटी ४१ लाख रुपयांची विकास कामे केली आहेत. १४ वित्त आयोगातून नगरपालिकेचे सभाग्रह व खासदार ऑफिस यांचे सुशोभीकरण सुरूच आहे. यासाठी ८ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जयवंत भाटले यांनी दिली.
यावेळी नगरसेवक संतोष सांगावकर, सुजाता कदम, दत्ता जोत्रे, रवी कदम, विनोद बागडे यांच्यासह नगरसेवक, जैन इरिगेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
निपाणी : शनिवारी निपाणी नगरपालिका सभागृहात मंत्री शशिकला जोल्ले यांनी बैठक घेऊन सूचना केल्या.